एल्गार न्यूज (परवेज पठाण) :-
बहुतेक प्राथमिक आरोग्य केंद्राचे काम अर्धवट किंवा अपूर्ण राहिलेले आहे की काय अशी परिस्थिती दिसत आहे, कारण आरोग्य विभागाने प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नुतन इमारतीचा लोकार्पण कार्यक्रम गुपचुपपणे पार पाडल्याने हा प्रश्न उपस्थित होत आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, कुंभार पिंपळगांव (ता.घनसावंगी, जि.जालना) येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे काम गेल्या दोन वर्षांपासून रडतपडत सुरू होते, कामाच्या दर्जाबाबतही मागील काळात सामान्य जनतेतून अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. त्यामुळे या इमारतीचे लोकार्पण करण्याची घाई सुटली होती का ? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
नवीन इमारतीचे लोकार्पण करण्यात आले असले तरी या प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉक्टर उपस्थित राहणार आहेत का ? कारण आतापर्यंतचा अनुभव पाहता ज्या डॉक्टरांवर या प्रा.आ.केंद्राची जबाबदारी आहे ते नेहमीच गैरहजर राहत असल्याचे रूग्णांकडून सांगण्यात येते.
अनेक मान्यवरांची अॅलर्जी ?
सदरील प्राथमिक आरोग्य केंद्राचे काम कसे बसे रडतपडत झाल्यानंतर आता त्याचे लोकार्पण करण्यात येत असताना गाव व परिसरातील विविध क्षेत्रातील मान्यवरांना निमंत्रित करणे आवश्यक असतांना जाणीवपूर्वक आरोग्य विभागाने कुठलीही कल्पना दिली नसल्याचे नागरिक सांगत आहेत. त्यामुळे आरोग्य विभागाला कुंभार पिंपळगांव व परिसरातील मान्यवरांची अॅलर्जी आहे का ? असाही प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे.
आरोग्य विभागाचे राजकारण ?
आरोग्य विभागाने कुंभार पिंपळगांव येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे गुपचुपपणे करून घेतलेले लोकार्पण चर्चेचा विषय ठरत आहे, कारण आरोग्य विभागाला सर्वपक्षीय पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांना कार्यक्रमापासून दूर ठेवून नेमकं काय साध्य करायचं होतं अशी चर्चाही परिसरात ऐकायला मिळत आहे.
अंधारात काय खिचडी शिजली ?
प्राथमिक आरोग्य केंद्राचे लोकार्पण करण्याचे जेव्हा ठरले, तेव्हा हा कार्यक्रम गुपचुपपणे लवकरात लवकर उरकून घेण्यासाठी रात्रीतून काही खिचडी शिजली का ? इमारतीच्या कामाच्या दर्जाबाबत सर्वसामान्य नागरिकांकडून जे प्रश्न उपस्थित केले जात होते, त्याची भिती मनात ठेवून तसेच काही गोंधळ होवू नये म्हणून काय्रक्रम गुपचुपपणे उरकून घेतलाय का ? असा सवालही उपस्थित केला जात आहे.