Your Alt Text

हिकमत उढाण हाती घेणार धनुष्‍यबाण ! पदाधिकारी व कार्यकर्त्‍यांच्‍या बैठकीत निर्णय !

व्‍हाट्सअॅप ग्रुप जॉईन करा.

एल्‍गार न्‍यूज (परवेज पठाण) :-
विधानसभा निवडणूक अवघ्‍या काही दिवसांवर येवून ठेपली असतांनाच शिवसेना (UBT) चे सहसंपर्कप्रमुख हिकमत उढाण यांनी मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे यांच्‍या शिवसेनेत प्रवेश करण्‍याचे निश्चित केले असून येत्‍या 10 तारखेला ते धनुष्‍यबाण हाती घेणार आहेत. घनसावंगी येथे दि.7 रोजी पदाधिकारी व कार्यकर्त्‍यांच्‍या बैठकीत हा निर्णय झाला आहे.

घनसावंगी मतदारसंघाचे सध्‍याचे आमदार राजेश टोपे यांचे कट्टर विरोधक समजले जाणारे हिकमत उढाण हे कोणत्‍याही परिस्थितीत निवडणुक लढणार हे आधीपासूनच निश्चित मानले जात होते. हिकमत उढाण आतापर्यंत उध्‍दव ठाकरे यांच्‍या शिवसेनेत कार्यरत होते, मात्र मागील काळात शिवसेना (UBT) महाविकास आघाडीत सामिल झाल्‍याने घनसावंगी मतदारसंघात राजकीय पेच निर्माण झाला होता.

कारण राजेश टोपे हे सध्‍या रनिंग आमदार आहेत आणि महाविकास आघाडीने शक्‍यतो रनिंग आमदारांना पुन्‍हा तिकीट देण्‍याचे निश्चित केल्‍याचे मानले जात आहे, अशा परिस्थितीत महाविकास आघाडीकडून जर राजेश टोपे हे पुन्‍हा उमेदवार राहणार असतील तर हिकमत उढाण यांना पर्याय शोधणे आवश्‍यक झाले होते.

आता हिकमत उढाण यांनी मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे यांच्‍या शिवसेनेत प्रवेश करण्‍याचे निश्चित केले असून येत्‍या 10 तारखेला मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे यांच्‍या हस्‍ते हिकमत उढाण यांच्‍या कारखान्‍याच्‍या दुसऱ्या युनिटचे भुमिपूजन होणार आहे, त्‍याचवेळी हिकमत उढाण यांचा पक्ष प्रवेश होणार असल्‍याचे सांगितले जात आहे. अर्थातच त्‍यांच्‍यासोबत मतदारसंघातील असंख्‍य कार्यकर्ते प्रवेश करणार आहेत.

अटीतटीची लढत !

गेल्‍या पंचवार्षिकला म्‍हणजेच 2019 मध्‍ये उध्‍दव ठाकरे यांची शिवसेना भाजप सोबत होती, त्‍यामुळे सेना-भाजप युतीचे उमेदवार म्‍हणून हिकमत उढाण व आघाडीकडून राष्‍ट्रवादीचे उमेदवार आमदार राजेश टोपे हे एकमेकांसमोर उभे होते, त्‍यावेळेस अत्‍यंत अटीतटीच्‍या लढतीत राजेश टोपे यांचा निसटता विजय झाला होता, अर्थातच हिकमत उढाण यांना अवघ्‍या काही मतांनी पराभव स्विकारावा लागला होता.

उमेदवारीसाठी प्रयत्‍न !

हिकमत उढाण यांनी एकनाथ शिंदे यांच्‍या शिवसेनेत प्रवेश करण्‍याचे निश्चित केले असून येत्‍या 10 तारखेला कार्यकर्त्‍यांसह पक्षप्रवेश होणार आहे. पक्ष प्रवेश झाल्‍यानंतर हिकमत उढाण यांना महायुतीकडून तिकीट मिळण्‍यासाठी प्रयत्‍न केले जाणार असून हिकमत उढाण यांना तिकीट मिळेल अशी कार्यकर्त्‍यांची भावना आहे. मात्र महायुतीकडून जो उमेदवार देण्‍यात येईल त्‍याच्‍यासाठी पूर्ण ताकदीने काम करायचे असे ठरल्‍याचेही एका कार्यकर्त्‍याने सांगितले.

कुर्बानी देगा कौन ?

घनसावंगी मतदारसंघात महायुतीच्‍या घटक पक्षातून निवडणुक लढण्‍यास अनेक जण इच्‍छुक आहेत, त्‍यापैकी प्रामुख्‍याने समृध्‍दी कारखान्‍याचे चेअरमन सतिष घाटगे हे गेल्‍या अनेक दिवसांपासून प्रयत्‍नशील आहेत, आता हिकमत उढाण हे महायुतीत प्रवेश करणार असल्‍याने कोण कोणासाठी कुर्बानी देतंय किंवा त्‍यागाच्‍या भावनेतून इच्‍छा बाजुला ठेवतंय हेच पाहणे महत्‍वाचे ठरणार आहे.


इतर बातम्‍या खाली पहा…

व्‍हाट्सअॅप ग्रुप जॉईन करा.

Leave a Comment

error: Content is protected !!