Your Alt Text

गोलमाल है भाई सब गोलमाल है ! कुंभार पिंपळगांव व परिसरातील कामगारांची लूट करणाऱ्या दलालाकडे बनावट शिक्‍के !

व्‍हाट्सअॅप ग्रुप जॉईन करा.

एल्‍गार न्‍यूज (परवेज पठाण) :-
कामगार विभागाच्‍या आशिर्वादाने दलाल हे कामगारांची सर्रासपणे लूट करत असून आतापर्यंत या दलालांनी कामगारांकडून लाखो रूपये कमवल्‍याचे समोर आले आहे. एवढंच कमी होतं की काय आता तर या दलालांकडे चक्‍क बनावट शिक्‍के असल्‍याचेही समोर आल्‍यामुळे कामगार विभाग काय झोपा काढत आहे का ? असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.

याबाबत सविस्‍तर वृत्‍त असे की, कुंभार पिंपळगांव (ता.घनसावंगी, जि.जालना) आणि परिसरातील बांधकाम कामगारांकडून दलालांनी लाखो रूपयांची लूट केल्‍याचे समोर आले आहे. गोरगरीब कामगार हे कबाडकष्‍ट करून आपल्‍या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत असतात. बहुतांश कामगार हे अशिक्षित किंवा अल्‍पशिक्षित आहेत, त्‍यांच्‍या अज्ञानाचा फायदा घेवून दलाल हे कामगारांची अक्षरश: लूट करत आहेत.

शासनाच्‍या महाराष्‍ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्‍याणकारी मंडळाच्‍या माध्‍यमातून राज्‍यातील कामगारांसाठी विविध योजना राबविल्‍या जातात. संबंधित कामगारांना सदरील योजनांची माहिती नसल्‍यामुळे दलाल हे कामगारांना योजनांचा लाभ मिळवून देण्‍यासाठी सुरूवातीला नोंदणीसाठी 2000 रूपये व दरवर्षी नुतनीकरण (Renewal) साठी जवळपास तेवढेच पैसे घेत आहेत. सर्वात महत्‍वाचे म्‍हणजे लग्‍नासाठी मंडळाकडून मिळणाऱ्या 30 हजार रक्‍कमेतून आधे तुम्‍हारे आधे हमारे हा फॉर्म्‍युला दलालांनी ठरवून कामगारांची अक्षरश: लूट सुरू केली आहे.

एवढंच नव्‍हे तर या मंडळा अंतर्गत कामगारांसाठी अनेक योजना आहेत, कोणत्‍याही योजनेचा लाभ हवा असेल तर त्‍यासाठी दलालांचा नियम ठरलेला आहे. म्‍हणजेच योजने अंतर्गत पैसे आल्‍यास त्‍यातील अर्धे आमचे अर्धे तुमचे या पद्धतीने दलाल कामगारांची लूट करत आहेत. जर कामगारांना हे मान्‍य नसेल तर तुम्‍हाला पैसे मिळणार नाहीत असे सांगितले जाते, कामगारांना योजनांची माहिती नसल्‍यामुळे शिवाय बसल्‍याजागी पैसे मिळत असल्‍यामुळे अनेक कामगार यांच्‍या अमिषाला बळी पडत आहेत. अर्थातच या दलालांनी कामगारांच्‍या जीवावर लाखो किंबहुना कोट्यावधी रूपये कमवल्‍याचे दिसून येत आहे.

घरीच थाटले ऑफीस !

कुंभार पिंपळगांव येथील एका दलालाने त्‍याच्‍या घरीच ऑफीस थाटले आहे, सदरील घरात कॉम्‍प्‍यूटर, प्रिंटर व इतर साहित्‍य जमा करून गेल्‍या अनेक महिन्‍यांपासून कागदपत्रांचा बाजार मांडला आहे. जे कागदपत्र सहजासहजी मिळत नाही ते कागदपत्र या दलालाकडे सहज उपलब्‍ध होतात. अर्थातच कामगारांच्‍या जीवावर या दलालाने बिल्‍डींग, चार चाकी गाडी, बॅंक बॅलेन्‍स, प्‍लॉट / जमीन अशी मोठी संपत्‍ती गोळा केली आहे.

50-50 फॉर्म्‍युला

सदरील दलालाने अनेक अधिकाऱ्यांना मॅनेज केल्‍याचे दिसत आहे, कारण कागदपत्र कमी असतील तरीही तुमचं काम करून देतो, मात्र येणाऱ्या रक्‍कमेत “आधे तुम्‍हारे आधे हमारे” असे मान्‍य असेल तरच पुढचं बोला नाही तर तुमचं काम होणार नाही, अशा प्रकारे कामगारांची सर्रासपणे लूट करण्‍यात येत आहे.

बनावट शिक्‍के !

कुंभार पिंपळगांव व सर्कल मधील कामगारांची सर्रासपणे लूट सुरू असतांना तसेच आता तर दलालाकडे बनावट शिक्‍के असल्‍याचे समोर आले आहे, त्‍यामुळे कामगार विभाग काय झोपा काढत आहे का ? असा सवाल नागरिक विचारत आहेत. कामगार विभागाने तातडीने या प्रकरणाची सखोल चौकशी करणे आवश्‍यक असून झोपी गेलेल्‍या कामगार विभागाला अजुनही जाग येणार नसेल तर जिल्‍हाधिकारी यांनी या प्रकरणी लक्ष देवून कारवाई करणे क्रमप्राप्‍त झाले आहे.


इतर बातम्‍या खाली पहा…

व्‍हाट्सअॅप ग्रुप जॉईन करा.

Leave a Comment

error: Content is protected !!