एल्गार न्यूज (परवेज पठाण) :-
काही अधिकाऱ्यांनी दलालांना कदाचित जास्तच डोक्यावर बसवलंय की काय असं म्हणण्याची वेळ आली आहे. कारण ज्या अधिकाऱ्यांच्या आशिर्वादाने संबंधित दलाल कोट्याधीश झाले तेच दलाल आता अधिकाऱ्यां विषयी खासगीत अपमानजनक व असभ्य भाषा बोलण्यासही कमी पडताना दिसत नाही.
कामगारांची प्रचंड लूट !
गोरगरीब कामगार कष्ट करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात, यातील बहुतांश कामगार हे अशिक्षित किंवा अल्पशिक्षित असतात. शिवाय त्यांना शासनाच्या महत्वपूर्ण व कल्याणकारी योजनांची शक्यतो माहिती नसते. याचाच फायदा घेवून दलाल कामगारांकडून अक्षरश: लूट करत आहेत. शासनाच्या महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या माध्यमातून राज्यातील कामगारांसाठी विविध योजना राबविल्या जातात. याच योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी सदरील दलाल कामगारांकडून हजारो रूपये उकळत आहेत.
कुं.पिंपळगाव परिसरात लूट !
कुंभार पिंपळगांव (ता.घनसावंगी, जि.जालना) या 20 ते 25 हजार लोकसंख्या असलेल्या शहरात आणि परिसरात असलेल्या 25 ते 30 गावात दलालांनी कामगारांना लुटण्याचा गोरखधंदा सुरू केला आहे. कामगार नोंदणीसाठी नगदी 2000 आणि इतर योजनांचे पैसे आल्यावर “आधे तुम्हारे आधे हमारे” असा प्रकार सर्रासपणे सुरू आहे. यामध्ये लग्न झाल्यावर कामगारांना शासनाकडून 30 हजार रूपये मिळतात, सदरील पैसे मिळवून देण्यासाठी हे दलाल 50-50 चा फॉर्मुला वापरत आहेत.
एवढंच नव्हे तर सदरील कामगार मंडळा अंतर्गत इतर विविध योजना व लाभांमध्येही या दलालांचा हिस्सा ठरलेला आहे. आम्हाला वर अधिकाऱ्यांचे खिसे गरम करावे लागतात म्हणून “आधे तुम्हारे आधे हमारे” हे मान्य असेल तरच बोला, नसता तुमचं काम होणार नाही असं ते कामगारांना सांगत आहेत. कामगारांना संबंधित योजनांची माहिती नसल्यामुळे शिवाय बसल्या जागी अर्धे पैसे मिळत असल्यामुळे कामगार सदरील दलालांच्या अमिषाला बळी पडत आहेत. अर्थातच या दलालांनी कामगारांच्या जीवावर लाखो किंबहुना कोट्यावधी रूपये कमवल्याचे दिसून येत आहे.
कागदपत्रांचा बाजार व माया !
कुंभार पिंपळगांव येथील सदरील दलालाने त्याच्या घरीच कॉम्प्यूटर, प्रिंटर व इतर साहित्य जमा करून गेल्या अनेक महिन्यांपासून सावळा गोंधळ सुरू केला आहे. जे कागदपत्र सहजासहजी भेटत नाहीत ते या दलालांकडे सहज उपलब्ध होतात, म्हणजेच सगळी यंत्रणा कार्यान्वित करून ठेवण्यात आली आहे. अर्थातच या दलालाने कामगारांच्या जीवावर बिल्डींग, चार चाकी गाडी, बॅंक बॅलेन्स, प्लॉट / जमीन अशी मोठी माया जमवून ठेवली आहे.
दलालांकडून कामाची खात्री !
जेव्हा एखादा सर्वसामान्य कामगार या दलालांना आमचं काम खात्रीने होईल का ? असं विचारत आहेत तेव्हा हे दलाल माज आल्याप्रमाणे खाजगीत सांगत आहेत की, कामगारांशी संबंधित अधिकाऱ्यांच्या तोंडावर बंडल फेकलं की अधिकारी झक मारून सह्या करतात आणि आमचं काम फायनल करतात. याचाच अर्थ असा की, दलालांना कॉन्फिडन्स म्हणा किंवा ओव्हर कॉन्फिडन्स म्हणा पण ते पैशाच्या जीवावर कोणालाही खरेदी करण्याची मानसिकता बाळगून आहेत. अर्थातच याला संबंधित अधिकारी सुध्दा तेवढेच जबाबदार आहेत. कारण त्यांनी या दलालांना डोक्यावर बसवलं नसतं आणि “अर्थपूर्ण” नियमबाह्य कामे केली नसती तर आज कोणाची बोलण्याची हिंमत झाली नसती.
जेवढ्या कॉन्फिडन्सने हे दलाल बोलत आहेत ते पाहता धूर तिथूनच निघतो जेथे आग लागलेली असते, अर्थातच देणंघेणे सुरू असावं आणि दिल्यावर खात्रीने काम होत असावं असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. त्यामुळेच की काय दलालांना फुल्ल कॉन्फिडन्स आलेला दिसत आहे. अर्थातच आता या फुल्ल कॉन्फिडन्स मध्ये असलेल्या दलालांना पुन्हा डोक्यावर बसवून कामगारांची लूट सुरूच ठेवायची की सर्वसामान्य कामगारांना दलालांशिवाय सहजपणे योजनांचा लाभ द्यायचा हे संबंधित अधिकाऱ्यांनी ठरवावे. शिवाय जमलंच तर सन्माननीय जिल्हाधिकारी व इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या दलालांचे नेटवर्क आणि फुल्ल कॉन्फिडन्स खंडित करता येते का ते पहावे, नसता “हम तुम्हारे है सनम” चित्रपट तर सुरूच आहे.
पुढील पंचनामा लवकरच…
टीप :-
आम्ही लिखाण करतांना शब्दांसह भाषेची मर्यादा राखण्याचा नेहमीच प्रयत्न करत असतो. मात्र दलालांकडून खाजगीत कामगारांकडे असभ्य भाषेत जे वाक्य बोलण्यात येत आहेत ते पूर्ण वाक्य / भाषा येथे मांडणे शक्य नाही. तरीही त्यातील किमान एखाद्या वाक्याने संबंधित अधिकाऱ्यांना बरंच काही लक्षात येईल या दृष्टीने नाईलाजाने हेडींग मधील वाक्य वापरण्यात आले आहे.