Your Alt Text

दलालांकडून कामगारांची प्रचंड लूट ! कुं.पिंपळगावात कामगार नोंदणीसाठी 2000 आणि लग्‍नाचे व इतर येणारे पैसे आधे तुम्‍हारे आधे हमारे !

व्‍हाट्सअॅप ग्रुप जॉईन करा.

एल्‍गार न्‍यूज (परवेज पठाण) :-
शासनाने कामगारांच्‍या कल्‍याणासाठी विविध योजना सुरू केलेल्‍या आहेत. सदरील योजनांच्‍या माध्‍यमातून कामगारांना विविध प्रकारचे लाभ देण्‍यात येतात. मात्र सदरील लाभ मिळविण्‍याकरीता कामगारांना दलालांशिवाय पर्याय राहिलेला दिसत नाही. कारण नोंदणीपासून ते विविध योजना मिळेपर्यंत “आधे तुम्‍हारे आधे हमारे” या धोरणानुसार दलाल कोट्यावधी रूपये कमवून कामगारांची अक्षरश: लूट करत असल्‍याचे दिसून येत आहे.

याबाबत सविस्‍तर वृत्‍त असे की, शासनाच्‍या महाराष्‍ट्र व इतर बांधकाम कामगार कल्‍याणारी मंडळाच्‍या माध्‍यमातून राज्‍यातील कामगारांसाठी विविध योजना राबविल्‍या जातात. सदरील मंडळात नोंदणी केल्‍यानंतर पहिल्‍या विवावाहाच्‍या प्रतिपुर्तीसाठी ३० हजार रूपये मिळतात, मुलांच्‍या शिक्षणासाठी पहिली ते 7 वी पर्यंत 2500, आठवी ते 10 वी साठी 5000 प्रति वर्ष देण्‍यात येतात.

इयत्‍ता 10 वी मध्‍ये किमान 50 टक्‍के किंवा अधिक गुण प्राप्‍त केल्‍यास 10 हजार रूपये, 11 वी 12 वी साठी प्रति वर्ष 10 हजार रूपये, पदवी अभ्‍यासक्रमा करीता 20 हजार रूपये (पत्‍नीसही लागू), वैद्यकीय पदवीकरीता प्रतिवर्षी 1 लाख रूपये, इंजिनिअरिंग पदवीकरीता 60 हजार रूपये, पदविका किंवा डिप्‍लोमासाठी 20 हजार रूपये मिळतात.

नैसर्गिक प्रसुतीसाठी 15 हजार रूपये, शस्‍त्रक्रियेद्वारे प्रसुतीसाठी 20 हजार, गंभीर आजाराच्‍या उपचारार्थ 1 लाख, कायमचे अपंगत्‍व आल्‍यास 2 लाख रूपये, कामावर असतांना कामगाराचा मृत्‍यू झाल्‍यास वारसास 5 लाख रूपये, नैसर्गिक मृत्‍यू झाल्‍यास 2 लाख रूपये, अटल बांधकाम कामगार आवाज योजने अंतर्गत शहरी व ग्रामीणसाठी 2 लाख रूपये, कामगाराचा मृत्‍यू झाल्‍यास अंत्‍यविधीकरीता 10 हजार, कामगाराचा मृत्‍यू झाल्‍यास त्‍याच्‍या विधवा पत्‍नीस अथवा स्‍त्री कामगाराच्‍या विधुर पतीस 24 हजार 5 वर्षांकरीता इत्‍यादी लाभ देण्‍यात येतात.

याशिवाय मध्‍यान्‍ह भोजन योजना, प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजना, प्रधानमत्री जीवनज्‍योती विमा योजना, सुरक्षा विमा योजना, पूर्व शिक्षण ओळख प्रशिक्षण योजना इत्‍यादी योजनांचा लाभ सदरील कामगार मंडळाच्‍या माध्‍यमातून देण्‍यात येत आहेत. मात्र या योजनांची माहिती नसल्‍यामुळे किंवा प्रोसेस माहिती नसल्‍यामुळे दलाल याचा फायदा घेत आहेत.

दलालांकडून कामगारांची लूट !

कुंभार पिंपळगांव (ता.घनसावंगी, जि.जालना) येथील दलालांच्‍या माध्‍यमातून कामगारांची प्रचंड लूट करण्‍यात येत आहे. कामगारांची नोंदणी करण्‍यासाठी 2000 रूपये घेण्‍यात येत आहेत, शिवाय पावत्‍या व संबंधित कागदपत्र स्‍वत : जवळ ठेवून वर्षाला रिन्‍युअलच्‍या वेळेसही तेवढेच पैसे घेण्‍यात येत आहे.

आधे तुम्‍हारे आधे हमारे !

सदरील कामगार मंडळा अंतर्गत येणाऱ्या विविध योजनांचे पैसे मिळवून देण्‍यासाठी कुंभार पिंपळगांव (ता.घनसावंगी) येथील दलाल “आधे तुम्‍हारे आधे हमारे” या धोरणानुसार कामगारांची अक्षरश: लूट करत आहेत. उदाहरणार्थ कामगाराला लग्‍नानंतर 30 हजार रूपये दिले जातात. सदरील 30 हजारातून 15 हजार कामगाराला देवून 15 हजार रूपये दलाल घेत आहेत. अशाच प्रकारे इतर मंडळाच्‍या इतर योजनांमध्‍येही 50-50 घेवून दलालांनी अक्षरश: लूट सुरू केली आहे.

कामगारांच्‍या पेट्यातही दलाली !

सदरील कामगार मंडळा अंतर्गत कामगारांना कामाच्‍या दृष्‍टीने व सुरक्षेच्‍या दृटीने विविध उपयोगी वस्‍तुंची पेटी दिली जाते, ज्‍यामध्‍ये बॅग, जॅकेट, हेल्‍मेट, जेवणाचा डबा, टॉर्च, चार्जर, पाण्‍याची बॉटल, मच्‍छरदाणी जाळी, सेफ्टी बूट, हात मोजे, चटई, इत्‍यादी वस्‍तू पेटीसह भेटतात, मात्र कुंभार पिंपळगांव व परिसरातील दलाल या पेट्या मिळवून देण्‍यासाठी सुध्‍दा कामगारांकडून प्रचंड लूट करत आहेत.

परिसरातील कामगारांचीही लूट !

कुंभार पिंपळगाव परिसरातील 20 ते 25 गावांमधील कामगारांना विविध अमिषे दाखवून सदरील दलाल कामगारांची प्रचंड प्रमाणात लूट करीत आहेत. दलालांनी परिसरातील कामगारांकडून कोट्यावधी रूपये कमवल्‍याचे सांगण्‍यात येत आहे. अर्थातच वरिष्‍ठ अधिकाऱ्यांनी या प्रकरणाचा थोडासा जरी तपास केला तरी खूप मोठा गोंधळ समोर येणार आहे.

कामगारांच्‍या जीवावर बिल्‍डींग आणि गाडी !

कुंभार पिंपळगांव येथील एका दलालाने कामगारांची प्रचंड प्रमाणत लूट करून अवघ्‍या काही महिन्‍यात लाखो रूपयांची माया जमवली आहे. काही महिन्‍यातच या दलालाने लाखोंची बिल्‍डींग, चार चाकी गाडी, बॅंक बॅलेन्‍स, प्‍लॉट /जमीन अशी कोट्यावधीची माया जमवली आहे. भोळ्या भाबळ्या कामगारांच्‍या अशिक्षित आणि अजानतेपणाचा फायदा उचलून या दलालांनी कामगारांसह शासनाचीही फसवणूक केली आहे.

दलालांच्‍या घरीच कागदपत्र !

कुंभार पिंपळगांव येथील एका दलालाने घरीच कॉम्‍प्‍यूटर, प्रिंटर व इतर साहित्‍य जमा करून कागदपत्रे काळे पांढरे करण्‍याची सगळी सोय करून ठेवली आहे. जे कागदपत्र सहजासहजी उपलब्‍ध होत नाहीत ते कागदपत्रे या दलालाकडे सहज उपलब्‍ध होवून जातात. कामगारांची लूट आणि शासनाची फसवणूक करण्‍याची यंत्रणा या दलालाने तयार करून ठेवली आहे.

अधिकाऱ्यांचा आशिर्वाद !

कुंभार पिंपळगाव व परिसरातील दलालांना जालना कार्यालयातील अधिकारी / कर्मचाऱ्यांचा आशिर्वाद असल्‍याचे दिसत आहे. कारण त्‍यांच्‍या आशिर्वादा शिवाय दलाल काहीच करू शकत नाहीत. एवढंच काय दलालच स्‍वत: कामगारांकडे आमचे संबंधित अधिकाऱ्यांशी कसे संबंध आहेत आणि आम्‍ही त्‍यांना मलीदा कसं पोहोचवतो हे सांगत आहेत. अर्थातच आमच्‍याशिवाय तुम्‍हाला योजनेचा लाभ मिळूच शकत नाही असे ते कामगारांना सांगुन त्‍यांची लूट करत आहेत.


मुख्‍य पानावरील बातम्‍या वाचण्‍यासाठी येथे क्लिक करा…

व्‍हाट्सअॅप ग्रुप जॉईन करा.

Leave a Comment

error: Content is protected !!