Your Alt Text

कुं.पिंपळगांव येथील बॅंक ऑफ महाराष्‍ट्र शाखेत शासकीय योजनांचे पैसे, KYC व इतर व्‍यवहारासाठी नागरिक वारंवार चकरा मारून हैराण !

व्‍हाट्सअॅप ग्रुप जॉईन करा.

एल्‍गार न्‍यूज (परवेज पठाण) :-
घनसावंगी तालुक्‍यातील कुंभार पिंपळगांव येथील बॅंक ऑफ महाराष्‍ट्र शाखेत नागरिकांना अनंत अडचणींचा सामना करावा लागत आहे, शासनाच्‍या विविध योजनांचा लाभ, केवायसी, व इतर बॅंकींग व्‍यवहारासाठी नागरिकांना बॅंकेत महिना महिना चकरा माराव्‍या लागत आहेत. त्‍यामुळे वरिष्‍ठांचे या बॅंक शाखेकडे लक्ष राहीले नाही का ? असा सवाल नागरिकांमधून विचारला जात आहे.

याबाबत सविस्‍तर वृत्‍त असे की, कुंभार पिंपळगाव ता.घनसावंगी जि.जालना हे घनसावंगी तालुक्यातील सर्वात मोठे मुख्य बाजारपेठ असलेले ठिकाण असून या सर्कल परिसरात विस ते पंचवीस गावे जोडलेले आहेत. या शहराची लोकसंख्या अंदाजे वीस ते पंचवीस हजार असुन येथे इंडिया पोस्ट बॅंक, राष्ट्रीयकृत बॅंक, तीन सहकारी बॅंक तसेच बारा पतसंस्था आहेत.

योजनांचे पैसे मिळेना !

बॅंक ऑफ महाराष्ट्र शाखा कुंभार पिंपळगाव ता.घनसावंगी जि.जालना येथे अनेक व्यापारी, शेतकरी,महिला बचत गट, शाळा, महाविद्यालय, ग्रामपंचायत यांचे खाते आहेत. परंतु सदरील सर्व खातेदारांना या शाखेत बॅंकेत व्यवहार करताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यातच शासनाने नुकतीच सुरू केलेली मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना व पंतप्रधान व मुख्यमंत्री किसान सन्मान योजना तसेच इतरही योजना सुरू असल्याने बॅंकेत अनेक महिलांची व पुरुषांची प्रचंड प्रमाणात गर्दी होत आहे.

अनेक महिलांच्या व पुरुषांच्या खात्यांना आधार सेडिंग (आधार लिंक) करणे, खाते उघडणे, खाते KYC, CKYC, करणे, बंद खाते नव्याने उघडणे यासह अनेक कामे बॅंकेत तातडीने होत नाही तर चक्क एक महिन्याचा कालावधी लागत आहे. प्राप्‍त माहितीनुसार बॅंक शाखेत एक शाखा व्यवस्थापक, उपव्यवस्थापक, कॅशियर, दफ्तरी सफाई कामगार इत्यादीच कर्मचारी आहेत. अपुऱ्या कर्मचा-या अभावी बॅंकेत खातेदारांना व्यवहार करण्यासाठी तासनतास ताटकळत उभे रहावे लागत आहे.

KYC संभाजीनगरहून ?

तसेच KYC संदर्भात नागरिकांनी विचारणा केली असता येथे कामे करण्यासाठी कर्मचारी कमी असल्याने KYC चे फॉर्म छत्रपती संभाजीनगर कार्यालयास पाठवले, कार्यालयाकडून केवायसी झाल्‍यानंतर पैसे निघतील असे त्यांनी कळवले. परंतु सदरील फॉर्म पाठवून पंधरा दिवस उलटले आहेत आता परत पंधरा दिवस लागतील असे सांगितले जाते, म्हणजे एक KYC करण्यासाठी जवळपास एक महिन्याचा कालावधी लागत आहे.

आर्थिक भुर्दंड !

केवळ KYC करण्यासाठी खातेदारांना एक महिन्याचा कालावधी लागतो तर इतर कामे करण्यासाठी किती लागणार ? असा प्रश्न खातेदारांना पडला आहे. त्यातच बॅंक ऑफ महाराष्ट्र शाखा कुंभार पिंपळगाव येथे KYC सह खातेदारांना पैसे भरण्यासाठी रूपये 50000/- हजार च्या वर भरणा करण्यासाठी प्रती 50000/- प्रती 100/- रु. दंड व 18/-रु. GST असा एकुण 118/- रुपये दंड प्रत्येक खातेदारां कडुन वसूल केला जात असल्‍याचे ग्राहक व नागरिकांचे म्‍हणणे आहे.

माणूस एक कामे अनेक !

बॅंकेची गर्दी व अशा प्रकारचे नाहक दंड बघून येथील व्यापारी वर्ग सदरील बॅंक शाखे पासून दुरावत चालला आहे. या शाखेत एकच कर्मचारी (कॅशियर) दिवसभरात पैसे वाटप करताना पासबुक प्रिंटिंग, RTGS, NEFT, KYC, CKYC, ACCOUNT OPENING, पिक कर्जासह इतर कामे करुन एक कलाकार अनेक रोल ची भुमिका निभावत कामे करताना दिसून येत आहे.

वेळेवर काम नाही !

शेतकरी, महिला व गोरगरीबांना शासनाच्‍या विविध योजनांचे पैसे बॅंकेकडून वेळेवर मिळत नसतील तर त्‍याचा उपयोग काय ? गावातील इतर बॅंक व पतसंस्‍था कर्मचारी जास्‍त असल्‍यामुळे तात्‍काळ सेवा पुरवतात, मात्र सदरील बॅंक शाखेत विविध समस्‍यांमुळे ग्राहकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

…नसता आंदोलन !

कुंभार पिंपळगांव येथील बॅंक ऑफ महाराष्‍ट्र शाखेत तातडीने कर्मचारी संख्‍या वाढवून खातेदारांना योग्‍य ती सेवा देण्‍यात यावी नसता लोकशाही मार्गाने आंदोलन करण्‍याचा इशारा कुंभार पिंपळगांव येथील ग्रामविकास युवा मंचच्‍या वतीने देण्‍यात आला आहे. सदरील निवेदन शाखा व्‍यवस्‍थापक यांच्‍या मार्फत छत्रपती संभाजीनगर येथील विभागीय व्‍यवस्‍थापकांना पाठवण्‍यात आले आहे. निवेदनावर ग्रामविकास युवा मंचच्‍या सदस्‍यांसह खातेदार व गांवक-यांच्‍या सह्या आहेत.


मुख्‍य पानावरील बातम्‍या वाचण्‍यासाठी येथे क्लिक करा…

व्‍हाट्सअॅप ग्रुप जॉईन करा.

Leave a Comment

error: Content is protected !!