Your Alt Text

शेकडो विद्यार्थी / विद्यार्थीनी असलेल्‍या शाळेलगत अवैध दारू विक्री ! उत्‍पादन शुल्‍क व पोलीस प्रशासन एखादी घटना घडण्‍याची वाट पाहत आहे का ?

व्‍हाट्सअॅप ग्रुप जॉईन करा.

एल्‍गार न्‍यूज (परवेज पठाण) :-
राज्‍यात विद्यार्थी व विद्यार्थीनींवर अत्‍याचाराच्‍या अनेक घटना घडूनही संबंधित विभाग व स्‍थानिक पोलीस जाणीवपूर्वक दुर्लक्ष करणार असतील तर याचा अर्थ काय घ्‍यायचा ? उत्‍पादन शुल्‍क विभाग व घनसावंगी पोलीस ठाणे एखादी संतापजनक घटना घडण्‍याची वाट पाहत आहे का ? असा सवाल आता नागरिकांमधून विचारला जात आहे.

याबाबत सविस्‍तर वृत्‍त असे की, कुंभार पिंपळगांव (ता.घनसावंगी, जि.जालना) येथे अवैध धंदे जोमात सुरू आहेत, गावात आणि गावाच्‍या बाहेर सुध्‍दा चारही दिशेला अवैध दारू विक्री, पत्‍ते, जुगार मोठ्या प्रमाणावर सुरू आहेत. हॉटेल धाब्‍यांवर सुध्‍दा सहजपणे अवैध दारू मिळत आहे, एवढं कमी होतं की काय, आता तर चक्‍क शेकडो लहान मोठे विद्यार्थी विद्यार्थीनी असलेल्‍या शाळेलगतच अवैध दारू विक्री राजरोसपणे सुरू आहे.

महिला व मुलींची अडचण !

सदरील नामांकित इंग्रजी शाळेमध्‍ये नर्सरी ते 10 वी पर्यंतचे शिक्षण दिले जाते. या शाळेत लहान मुलांपासून किशोरवयीन मुले-मुली शिक्षण घेतात, मात्र सदरील शाळेच्‍या कंपाऊंड जवळच अवैध दारूची दुकान राजरोसपणे सुरू आहे. शाळेची वेळ सकाळची असून सकाळपासूनच मद्यपींची रेलचेल सुरू होते, त्‍यामुळे मुला-मुलींना शाळेत सोडण्‍यासाठी येणाऱ्या महिला – पालकांना सदरील अवैध दारूच्‍या दुकानासमोरून मान खाली घालून जावे लागते.

शासनाच्‍या नियमानुसार शाळा, विद्यालय किंवा महाविद्यालयाच्‍या 100 मिटर परिसरात अमली व तंबाकुजन्‍य पदार्थ विकण्‍यास बंदी आहे, मात्र सदरील ठिकाणी शासनाचे सर्व नियम कायदे धाब्‍यावर बसवून सर्रासपणे अवैध दारू विक्री केली जात आहे. राज्‍यात अल्‍पवयीन मुला-मुलींवर किंवा विद्यार्थीनींवर अत्‍याचाराच्‍या अनेक घटना घडलेल्‍या असतांना उत्‍पादन शुल्‍क विभाग किंवा पोलीस प्रशासन एखाद्या संतापजनक घटनेची वाट पाहत आहे का ? असा सवाल नागरिक विचारत आहेत.

अवैध धंदे जोमात !

कुंभार पिंपळगांव शहरात तसेच शहराच्‍या चारही दिशेला जाणाऱ्या रस्‍त्‍यांवर किंवा धाब्‍यांवर देशी, विदेशी दारू सर्रासपणे विक्री केली जात आहे. जुगार किंवा पत्‍याचे क्‍लब चारही दिशेला सुरू आहेत. त्‍यामुळे कुंभार पिंपळगांव परिसर अवैध धंद्यांचे केंद्रबिंदू बनल्‍याचे दिसत आहे. त्‍यामुळे उत्‍पादन शुल्‍क विभाग व पोलीस प्रशासनाने सदरील शाळेसह परिसरात सुरू असलेली अवैध दारू विक्री तात्‍काळ बंद करावी शिवाय पोलीस प्रशासनाने इतर सुरू असलेले अवैध धंदे सुध्‍दा तातडीने बंद करावेत अशी मागणी विद्यार्थ्‍यांच्‍या पालकांसह गावातील नागरिकांनी केली आहे.


मुख्‍य पानावरील बातम्‍या वाचण्‍यासाठी येथे क्लिक करा…

व्‍हाट्सअॅप ग्रुप जॉईन करा.

Leave a Comment

error: Content is protected !!