Your Alt Text

श्रीक्षेत्र जांबसमर्थ येथे अवैध दारू व जुगारामुळे अनेक कुटुंब उध्‍वस्‍त ! कारवाई करणार – अति.पोलीस अधिक्षक

व्‍हाट्सअॅप ग्रुप जॉईन करा.

एल्‍गार न्‍यूज (परवेज पठाण) :-
समर्थ रामदास स्‍वामींचे जन्‍मस्‍थान असलेले श्रीक्षेत्र जांबसमर्थ (ता.घनसावंगी, जि.जालना) या गावात सध्‍या अवैध दारू विक्री व जुगार अड्ड्यांची संख्‍या प्रचंड वाढली असून तरूण पिढी बर्बाद होण्‍याची शक्‍यता निर्माण झाली आहे. कारण गावात असंख्‍य तरूण दारूच्‍या आहारी जात असून जिकडे तिकडे जुगाराचे अड्डे निर्माण झाल्‍यामुळे अनेक कुटुंब उध्‍वस्‍त होत आहेत.

याबाबत सविस्‍तर वृत्‍त असे की, घनसावंगी तालुक्‍यातील जांबसमर्थ येथे मोठ्या प्रमाणावर अवैध दारू विक्री होत आहे, जेथे तेथे अवैध दारूची दुकाने सुरू झाली आहेत, अवैध दारूचे प्रमाण इतके वाढले आहे की, गावात नवयुवक सुध्दा मोठ्या प्रमाणात दारूच्या आहारी जात आहेत. तसेच गावात अनेक ठिकाणी व शेतांमध्ये जुगाराचे अड्डे सुरू झाले आहेत, ज्यामध्ये पत्ते व इतर खेळांचा समावेश आहे.

अवैध दारू विक्री व जुगारामुळे जांबसमर्थ येथील अनेक परिवार बर्बाद झाले आहेत, अवैध दारू व जुगारामुळे नेहमी घरात व गावात भांडणे व वाद होत आहेत. अवैध दारू व जुगार बंद करण्याबाबत जांबसमर्थ ग्रामपंचायतने ठराव सुध्दा दिलेला आहे. सदरील ग्रामपंचायत ठरावासह राज्य उत्पादन शुल्क विभाग जालना यांना दि.20/08/2024 रोजी व पोलीस ठाणे घनसावंगी, तहसील कार्यालय घनसावंगी यांना दि. 14/08/2024 रोजी गांवकऱ्यांच्‍या वतीने निवेदन दिले होते, परंतू अद्याप कुठलीही कार्यवाही झालेली नाही.

अवैध दारू विक्री व जुगार अड्डे बंद करण्यासाठी गांवकऱ्यांनी उपोषणही केले होते, तेव्हा घनसावंगी पोलीसांनी गांवकऱ्यांना अवैध दारू व जुगार अड्डे बंद करण्याचे आश्वासन दिल्यानंतर गांवकऱ्यांनी उपोषण सोडले होते. मात्र अद्यापपर्यंतही काहीच कारवाई झालेली नाही. त्‍यामुळे संबंधित विभाग व पोलीस प्रशासनाने तात्काळ जांबसमर्थ येथील अवैध दारू विक्री व सर्व जुगार बंद करावेत अशी मागणी गांवकऱ्यांच्‍या वतीने निवेदनाद्वारे करण्‍यात आली आहे, नसता नाईलाजाने उपोषणास बसावे लागेल, असा इशाराही गांवकऱ्यांनी दिला आहे.

सदरील निवेदन पोलीस अधिक्षक जालना, अतिरिक्‍त पोलीस अधिक्षक जालना, राज्‍य उत्‍पादन शुल्‍क विभाग जालना, उपविभागीय पोलीस अधिकारी अंबड, घनसावंगी पोलीस ठाणे इत्‍यादींना देण्‍यात आले असून निवेदनावर शोभा कांबळे, अरूणा गणकवार, कौशल्‍या गणकवार, चंद्रकला कदम, अल्‍का गणकवार, कौशल्‍या वायदळ, नंदाबाई लंगुटे, शारदाबाई, अर्चना कदम, सिद्धोधन खरात यांच्‍यासह गावातील असंख्‍य नागरिकांच्‍या सह्या आहेत.

कारवाई करणार !

जांबसमर्थ येथील गांवकऱ्यांच्‍या वतीने अवैध धंद्यांबाबत निवेदन प्राप्‍त झाले आहे, विषय गंभीर असून याबाबत सर्व यंत्रणांना सूचना देण्‍यात आल्‍या असून दोषींवर आवश्‍य कारवाई करण्‍यात येईल. कोणालाही पाठीशी घातले जाणार नाही.

  • आयुष नोपाणी,
    अति. पोलीस अधिक्षक, जालना

मुख्‍य पानावरील बातम्‍या वाचण्‍यासाठी येथे क्लिक करा…

व्‍हाट्सअॅप ग्रुप जॉईन करा.

Leave a Comment

error: Content is protected !!