Your Alt Text

बोकडं आणि कोंबड्या कापल्‍यावर मांस विक्री करिता दुकानाच्‍या दर्शनी भागात शोपीस प्रमाणे प्रदर्शन कशासाठी ?

व्‍हाट्सअॅप ग्रुप जॉईन करा.

एल्‍गार न्‍यूज (परवेज पठाण) :-
कायद्याने सर्वांना आपापले उद्योग व्‍यवसाय करण्‍याची मुभा दिलेली असली तरी त्‍यासाठी सुध्‍दा काही चौकट किंवा नियम आखुन दिलेले आहेत. म्‍हणजेच आपल्‍या कोणत्‍याही कृतीमुळे इतर कोणाच्‍या भावना दुखावणार नाही किंवा इतर कोणालाही त्रास होणार नाही याची काळजी घेणे आवश्‍यक आहे. मात्र काही विक्रेत्‍यांना याचा विसर पडलेला दिसत आहे.

याबाबत सविस्‍तर वृत्‍त असे की, घनसावंगी तालुक्‍यातील कुंभार पिंपळगांव येथे अनेक ठिकाणी रस्‍त्‍यालगत असलेल्‍या बोकडाचे मटन व चिकनच्‍या दुकानांमध्‍ये मांस उघडे ठेवून सर्रास विक्री केली जात आहे. अंबड – पाथरी हायवे असो किंवा ईदगाह जवळ असलेली दुकाने असो, या सर्व ठिकाणी नियमांची पायमल्‍ली करून बोकडाचे व कोंबडीचे मांस विक्री करण्‍यात येत आहे.

इतरांना नाहक त्रास !

समाजात मोठ्या प्रमाणावर नागरिक शाकाहारी आहेत. त्‍यांच्‍या भावनांचा आदर करणे आवश्‍यक आहे. बोकडाचे अथवा कोंबडीचे मांस विक्री करण्‍यास कोणी कोणाला रोखलेले नाही, परंतू कोणी बोकडं अथवा कोंबड्या कापून स्‍वत:च्‍या दुकानासमोर दर्शनी भागात शोपीस प्रमाणे लटकवित असेल तर त्‍यामुळे इतरांना त्रास होवू शकतो याचा विचार संबंधितानी करणे आवश्‍यक आहे. संबंधित 5 – 10 लोकांच्‍या एखाद्या कृतीमुळे इतरांकडे सुध्‍दा वेगळ्या नजरेने पाहिले जावू शकते, याचं भान संबंधित विक्रेत्‍यांनी ठेवणे आवश्‍यक आहे.

दुकाने स्‍वत:ची असली तरी !

जागा किंवा दुकान स्‍वत:च्‍या मालकीची आहे म्‍हणजे आपल्‍याला नियम कायदे पायदळी तुडवून आपल्‍या मनमर्जी प्रमाणे व्‍यवसाय करता येत नाही. उदा. बोकड किंवा कोंबड्या कापल्‍यानंतर जी घाण व दुर्गंधीयुक्‍त कचरा जमा होतो तो बऱ्याचदा रस्‍त्‍यावर पसरतो, तसेच कोंबडी कापल्‍यानंतर कोंबडीचे पखं रस्‍त्‍यावर येतात, अनेकदा मांसाचे तुकडे रस्‍त्‍यावर कुत्रे घेवून फिरतांना दिसून येतात, त्‍यामुळे रस्‍त्‍याने ये-जा करणाऱ्यांना नाहक त्रास होतो, विशेष म्‍हणजे याच परिसरात इतर विविध व्‍यावसायिक किंवा व्‍यापाऱ्यांची अनेक दुकाने सुध्‍दा आहेत, त्‍यांनाही त्रास होतो.

किमान पडदे लावा !

ज्‍या संबंधित दुकानात बोकडाचे अथवा कोंबडीचे मांस विक्री होते तेथे शोपीस प्रमाणे मांस लटकवलेले असतात, त्‍यामुळे त्‍या भागात व्‍यवसाय करणाऱ्या इतर व्‍यापारी बांधवांना त्रास तर होतोच शिवाय त्‍या भागात इतर वस्‍तू खरेदी करण्‍यासाठी जाण्‍यास ग्राहक सुध्‍दा विचार करतात, त्‍यामुळे त्‍याचा व्‍यवसायावर सुध्‍दा परिणाम होतो. त्‍यामुळे संबंधित मटन, चिकन शॉपच्‍या दुकानदारांनी एकतर सदरील मांस इतरांना दिसणार नाही अशा पध्‍दतीने समोर काळा काच लावणे किंवा एखादा पडदा लावणे आवश्‍यक आहे.

ग्राहकांची अडचण नाही !

बोकडाचे अथवा कोंबडीच्‍या मांस विक्रेत्‍यांनी ग्राहकांची चिंता करण्‍याची आवश्‍यकता नाही, ज्‍यांना मटन, चिकन खाण्‍याची सवय आहे ते कोठेही यायला बसले आहेत. मटन, चिकनवाल्‍यांनी (मांस विक्रेत्‍यांनी) जंगलात दुकान थाटून बसले तरी तेथे थेट किंवा फोन करून येण्‍यासही कोणी कमी पडणार नाही. मग अशा प्रकारे शोपीस प्रमाणे मांस लटकवून तसेच अस्‍वच्‍छता पसरवून इतरांना त्रास देण्‍यात काय अर्थ आहे. अर्थातच समोरील भागात ब्‍लॅक काच किंवा पडदा लावण्‍यास काहीच अडचण नाही.

शहरांमध्‍ये बहुतांश ठिकाणी अशा प्रकारे समोर काळा काच किंवा पडदा लावण्‍यात येतो मग आपल्‍याकडे का नाही. त्‍यामुळे संबंधित मांस विक्रेत्‍यांनी सर्व समाजाच्‍या भावनांचा विचार करून तातडीने दर्शनी भागात काळा काच किंवा पडदा लावणे आवश्‍यक आहे. शिवाय योग्‍य प्रकारे स्‍वच्‍छता ठेवणे आवश्‍यक आहे. असं म्‍हटलं जातं की, कायद्यापुढे शहाणपण चालत नाही, जे की बरोबर आहे. त्‍यामुळे संबंधित विक्रेत्‍यांनी वेळीच सुधारणा करावी नसता, वेळ पडल्‍यास संबंधित विभाग व पोलीस प्रशासन कारवाई करायला मागे पुढे पाहणार नाही एवढे मात्र नक्‍की.

संबंधित मटन, चिकन शॉप धारकांनी रस्‍त्‍यावरून ये-जा करणाऱ्यांना मांस दिसणार नाही अशा पध्‍दतीने झाकण्‍याची व्‍यवस्‍था करावी, तसेच निघणाऱ्या घाण व कचऱ्याची योग्‍य प्रकारे विल्‍हेवाट लावणे आवश्‍यक आहे, याबाबत संबंधित विक्रेत्‍यांना तातडीने सूचना देण्‍यात येतील. नियमांचे पालन न करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्‍यात येईल.

  • केतन राठोड, पोलीस निरीक्षक,
    पोलीस ठाणे, घनसावंगी
व्‍हाट्सअॅप ग्रुप जॉईन करा.

Leave a Comment

error: Content is protected !!