एल्गार न्यूज (परवेज पठाण) :-
शाळेच्या मुख्याध्यापकांनी शाळेत अनुचित प्रकार घडला असल्याचे लक्षात येताच संबंधितांवर तात्काळ गुन्हा नोंद करावा. शाळेत अनुचित घटना घडूनही जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात आल्यास संबंधित मुख्याध्यापकांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांनी दिले आहेत. विद्यार्थी – विद्यार्थीनीच्या सुरक्षा विषयक उपाययोजनां करीता आयोजित कार्यशाळेत ते बोलत होते.
शालेय विद्यार्थ्यांचा शिक्षणासोबतच त्यांच्या सुरक्षेचा मुद्दा अत्यंत महत्वपूर्ण आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व शाळेच्या परिसरात तातडीने सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे बंधनकारक करण्यात आले आहे. तसेच शाळेत स्वसंरक्षणासह गुड टच, बॅड टच याबाबत धडे देण्यात यावेत.
जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल भवनात विद्यार्थी- विद्यार्थींनीच्या सुरक्षा विषयक उपाययोजना कार्यशाळा पार पडली, याप्रसंगी ते बोलत होते. कार्यशाळेत जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा मिना, पोलिस अधिक्षक अजयकुमार बन्सल, अपर जिल्हाधिकारी रिता मैत्रेवार, जि.प. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी शिरीष बनसोडे, अतिरिक्त पोलिस अधिक्षक आयुष नोपाणी, शिक्षणाधिकारी कैलास दातखीळ, मंगला धुपे यांची प्रमुख उपस्थिती होती.
जिल्हाधिकारी डॉ.पांचाळ म्हणाले की, विद्यार्थ्यांची सुरक्षा सर्वतोपरी असल्याने यात तडजोड करण्यात येवू नये. मुख्याध्यापकासह शिक्षकांनी विद्यार्थी-विद्यार्थींनीच्या सतत संपर्कात रहावे तसेच दोघांच्याही सुरक्षितेवर लक्ष द्यावे. शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबाबत करावयाच्या ठोस उपाययोजनांचा भाग म्हणून मुख्याध्यापकांच्या कक्षाजवळ तक्रार पेटी बसवावी तसेच त्यामधील नियमित तक्रार पाहण्यापासून ते तक्रारींचे निराकरण करण्याचे काम स्वत: मुख्याध्यापकांनी करावे.
शाळांनी शिक्षकेत्तर कर्मचाऱ्याच्या नेमणुकीपुर्वी स्थानिक पोलिस विभागाकडून चारित्र्य पडताळणी अहवाल प्राप्त करुन घेणे आवश्यक राहील. खाजगी शाळेच्या बसवर संबंधित व्यवस्थापनाने महिला मतदनीसाची प्राधान्याने नियुक्ती करावी. तसेच विद्यार्थी सुरक्षा समित्याचा आढावा गटविकास अधिकाऱ्यांनी नियमितपणे घ्यावा. शाळेच्या परिसरात दर्शनीय भागावर चाईल्ड हेल्पलाईन क्रमांक 112 नमुद करावा.
शाळेतील मुला-मुलींच्या सुरक्षिततेसाठी व निकोप आणि समतामुलक वातावरण निर्मितीसाठी विविध स्तरावर सखी सावित्री समिती तसेच विद्यार्थी सुरक्षा समितींने नेमून दिलेली कार्ये विहीत कालावधीत पार पाडणे आवश्यक असल्याच्या सुचनाही यावेळी दिल्या. तसेच शाळेत अनुचित घटना घडल्यास तात्काळ गुन्हा नोंद केल्यास सर्व गोष्टींना सामोरे जावे लागेल याची मनात भिती बाळगू नका, या सर्व प्रकरणात जिल्हा प्रशासन आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे राहील, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. या कार्यशाळेस जिल्ह्यातील गटशिक्षणाधिकारी, शिक्षण विस्तार अधिकारी, प्रशालेचे मुख्याध्यापक, केंद्र प्रमुख, साधन व्यक्ती यांच्यासह संबंधित यंत्रणेचे अधिकारी उपस्थित होते.