एल्गार न्यूज (परवेज पठाण) :-
नियम कायद्याची पायमल्ली करून चुकीच्या मार्गाने पैसा कमवलेला असेल तर सहज आणि शांतपणे झोप लागत नाही असे अनेकदा ऐकायला मिळते, कदाचित हीच बाब कुंभार पिंपळगांव आणि परिसरातील अनेकांवर लागू पडत असावी, त्यामुळेच की काय एखाद्या शब्दामुळे सुध्दा अनेकांच्या झोपा उडत असल्याचे ऐकायला मिळत आहे.
ब्लॅक मनी म्हणजे काय ?
खरं तर हा विषय खूप विस्तारीत आहे शिवाय त्यातही विविध प्रकार आहेत, परंतू थोडक्यात आणि सोप्या भाषेत सांगायचे झाल्यास एकतर जो पैसा अवैधरित्या कमविलेला आहे आणि दुसरा म्हणजे जो पैसा वैधरित्या कमविलेला आहे परंतू ज्यावर स्थानिक, राज्य व केंद्र सरकारला देय असणारा कर दिला गेलेला नाही असा पैसा ब्लॅक मनी (काळा पैसा) म्हणून संबोधला जातो.
कर भरणे का आवश्यक ?
शासनाने ठरवून दिलेले कर (प्रत्यक्ष / अप्रत्यक्ष) जेव्हा संबंधित करदाता भरत असतो तेव्हा त्या कराच्या पैशाच्या माध्यमातून देशातील गोरगरीब व सर्वसामान्य नागरिकांच्या हिताचे निर्णय घेणे कोणत्याही सरकारला किंवा शासनाला शक्य होते. कोणतीही योजना असेल, विकास कामे असतील किंवा देशहिताचे कोणतेही निर्णय असतील तर ते प्राप्त होणाऱ्या कर (टॅक्स) च्या माध्यमातूनच मार्गी लावले जातात.
कोणाची झोप उडते ?
ब्लॅक मनी अर्थात काळा पैसा म्हटले की, खालपासून वरपर्यंत म्हणजेच जिल्ह्यापासून देशाच्या राजधानी पर्यंतच्या तपास यंत्रणा अॅक्टीव्ह मोडवर येतात असे आपल्याला वेळोवेळी पहायला मिळते. त्यामुळे ज्यांच्याकडे ब्लॅक मनी (काळा पैसा) आहे किंवा जे नियम कायदे पायदळी तुडवून गैरमार्गाने अमाप संपत्ती कमवित असतात अशांची झोप उडत असते.
मुळव्याध आणि ब्लॅक मनी !
मुळव्याध आणि ब्लॅक मनी या दोघांमध्ये एक साम्य आहे. मुळव्याध बद्दल बोलताही येत नाही आणि दाखवताही येत नाही. तसंच ब्लॅक मनीचं (काळ्या पैशाचं) सुध्दा आहे, म्हणजेच ब्लॅक मनी बद्दलही सांगताही येत नाही आणि दाखवताही येत नाही. आता प्रश्न उपस्थित होतो की, ज्यांच्याकडे ब्लॅक मनी आहे त्यांना असलेला मुळव्याध कदाचित वेगळ्या प्रकारचा आहे का ? म्हणजे ब्लॅक मनी शब्द ऐकला किंवा वाचला तर त्यांना त्रास होण्यामागचं कारण काय ?
कुं.पिंपळगावात थयथयाट का ?
एल्गार न्यूजने मागील काळात विविध विषय बातमीच्या माध्यमातून घेतलेले आहेत. सदरील विषय थेट ब्लॅक मनी संदर्भात जरी नसले तरी या बातम्यांमध्ये कुठेतरी ओझरता उल्लेख ब्लॅक मनीचा झालेला आहे. आता आपण कुंभार पिंपळगाव शहरात ब्लॅक मनी नाही असे थोड्या वेळासाठी गृहीत धरल्यास, मग प्रश्न उपस्थित होतो की, जेव्हा जेव्हा एल्गार न्यूजने प्रकाशित केलेल्या बातमी मध्ये ब्लॅक मनीचा फक्त ओझरता उल्लेख आला आहे तेव्हा तेव्हा अनेकांचा मुळव्याध का उठू राहिलाय ? काही लोकांचा थयथयाट कशासाठी होवू लागलाय ? हेच कोडे सध्या सुटलेले नाही.