एल्गार न्यूज (परवेज पठाण) :-
घनसावंगी तालुक्यात मागील काही दिवसांपासून विविध गावांमध्ये रात्री अपरात्री ड्रोन घिरट्या घालत आहे, वारंवार विविध गावांमध्ये ड्रोन (कॅमेरा असलेले यंत्र) घिरट्या घालत असल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. विशेष म्हणजे अद्याप पर्यंत ड्रोन उडवणाऱ्या कोणीही पोलीस प्रशासनाकडे नोंद केलेली नाही अथवा परवानगी घेतलेली नाही, याचाच अर्थ सदरील ड्रोन बेकायदेशीरपणे उडवले जात आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यात अनेक गावांमध्ये रात्री अपरात्री ड्रोन घिरट्या घालत आहे. सुरूवातीला नागरिकांनी या प्रकाराकडे दुर्लक्ष केले, मात्र वारंवार सदरील ड्रोन रात्रीच्या वेळी दिसून येत असल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. अनेक गावांमध्ये नागरिकांच्या अक्षरश: झोपा उडाल्याचे दिसून येत आहे.
सदरील ड्रोन नेमकं कोण उडवत आहे ? ड्रोन उडवण्यामागे त्याचा उद्देश काय ? ड्रोनच्या माध्यमातून छायाचित्र किंवा व्हिडीओ रेकॉर्ड करून विविध गावांची रेकी केली जात आहे का ? आसपास कोणी दिसत नाही मग हे ड्रोन लांब अंतरावरून कोणी उडवत आहे का ? ड्रोनच्या माध्यमातून काही कारस्थान रचले जात आहे का ? असे अनेक प्रश्न नागरिकांना पडत आहेत.
रात्री बराच वेळ हे ड्रोन विविध गावांवर घिरट्या घालून नंतर गायब होत आहे. विशेष म्हणजे कोणत्याही प्रकारचे ड्रोन उडवायचे असेल तर त्याची रितसर परवानगी घ्यावी लागते, मात्र कोणत्याही पोलीस ठाणे किंवा जिल्हा पोलीस अधिक्षक कार्यालयाकडे याची नोंद नसल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यामुळे अर्थातच सदरील गंभीर प्रकरणाची तातडीने चौकशी करून संबंधितावर कारवाई करणे आवश्यक झाले आहे.
तातडीने कारवाई व्हावी !
घनसावंगी तालुक्यात अशा प्रकारे विविध गावांमध्ये रात्रीच्या वेळी ड्रोन घिरट्या घालत असेल आणि तशी परवानगी प्रशासनाकडे कोणीही घेतली नसेल तर हे प्रकरण गंभीर आहे, याची तातडीने चौकशी होवून कारवाई व्हावी.
- रविंद्र तौर
प्रदेश सरचिटणीस, रा.काँ.पार्टी
चौकशी होणे आवश्यक !
घनसावंगी तालुक्यात अनेक गावांमध्ये रात्री अपरात्री ड्रोन फिरत आहेत, त्यामुळे नागरिकांमध्ये भिती पसरत आहे. पोलीस प्रशासनाकडे नोंद नसेल तर अशा प्रकारे ड्रोन कसे फिरत आहे ? त्यामुळे याचा तातडीने तपास करून पोलीसांनी योग्य ती कारवाई करावी.
- शामसुंदर उढाण,
माजी जि.प.सदस्य
तात्काळ तपास व्हावा !
घनसावंगी तालुक्यातील अनेक गावांमध्ये रात्रीच्या वेळी बेकायदेशीरपणे ड्रोन घिरट्या घालत आहे, त्यामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण असून पोलीस प्रशासनाने तात्काळ याची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी.
- संदिप कंटुले, तालुकाप्रमुख,
शिवसेना (UBT) घनसावंगी
प्रशासनाला निवेदन !
घनसावंगी तालुक्यात रात्री अपरात्री अनेकवेळा बेकायदेशीरपणे ड्रोन फिरत असल्याने नागरिकांची झोप उडाली आहे, याबाद्दल प्रशासनाला निवेदन देण्यात आले असून चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.
- अनिरूध्द शिंदे (गटनेता)
पंचायत समिती, घनसावंगी
पोलीसांनी चौकशी करावी !
घनसावंगी तालुक्यात अनेक गावांमध्ये रात्री ड्रोन घिरट्या घालत असून ड्रोनच्या बद्दल कोणालाच माहिती नसल्याने भितीमुळे नागरिकांना रात्र जागून काढण्याची वेळ आली आहे. त्यामुळे पोलीस प्रशासनाने नेमका हा प्रकार काय याची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी.
- दिलीप राऊत,
जि.उपाध्यक्ष, रा.यु.काँ. (SP)
तपास सुरू आहे !
अंबड व घनसावंगी तालुक्यात विविध गावांमध्ये ड्रोन घिरट्या घालत असल्याची माहिती आमच्या पर्यंत आलेली आहे. पोलीस प्रशासनाकडे ड्रोन उडवण्याबाबत कोणीही परवानगी घेतलेली नाही. नागरिकांनी घाबरू नये, या प्रकरणाचा तपास सुरू असून जो कोणी दोषी असेल त्याच्यावर कारवाई केली जाईल.
- आयुष नोपानी,
अति.पोलीस अधिक्षक, जालना