एल्गार न्यूज (परवेज पठाण) :-
कुंभार पिंपळगांव (ता.घनसावंगी, जि.जालना) येथील सोनेरी दुनियेत कोट्यावधी रूपयांचा काळा बाजार कशा प्रकारे सुरू आहे याबाबत एल्गार न्यूजने यापूर्वी वेळोवेळी बातम्या प्रकाशित करून सर्व गोंधळ समोर आणल्यानंतर सदरील गंभीर प्रकरण वरिष्ठांपर्यंत गेल्याचे सुत्रांनी सांगितले.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, कुंभार पिंपळगांव (ता.घनसावंगी, जि.जालना) येथे विविध सोन्या चांदीच्या दुकानांवर GST चे सर्व नियम कायदे धाब्यावर बसवून अक्षरश: साध्या पावत्यांवर सोने, चांदी व दागिने विक्री करण्यात येत आहेत. सदरील पावत्या GST सहीत नाहीत, तसेच त्या पावत्यांवर GST चा क्रमांक सुध्दा नाही. एवढंच नव्हे तर त्या पावत्यांवर सोने किती कॅरेटचे आहे त्याचीही माहिती नाही. त्यामुळे ग्राहकांना ते घेत असलेले सोने किती कॅरेटचे आहे याची माहिती होत नाही. विशेष म्हणजे जेवढे कॅरेट कमी तेवढे सोन्याचे दर कमी असतात. मात्र येथे नियमांची पायमल्ली होत आहे.
सोन्याचे दागिने बनवतांना एक विशिष्ट धातू त्यात मिक्स केला जातो, कारण त्याशिवाय दागिने तयारच होत नाहीत, परंतू सोन्याचे दागिने बनवतांना सोन्याच्या व्यतिरिक्त किती धातू वापरण्यात आले आहे ? धातू प्रमाणापेक्षा जास्त तर वापरला नाही ना ? याची कुठलीही माहिती ग्राहकांना नसते. त्यामुळे प्युअर सोन्याचे दागिने म्हणून घेण्यात येणारे सोने किती कॅरेटचे आहे आणि नियमान्वये ते बनवण्यात आलेले आहे का ? याचीही माहिती ग्राहकांना होत नाही. मात्र ग्राहकांकडून पैसे तर दुकानदाराच्या हिशोबानेच घेतले जातात.
गांव नव्हे शहर !
कुंभार पिंपळगांव हे आता गाव राहिलेले नसून केव्हाच शहर झालेले आहे. तालुक्यातील सर्वात मोठे मार्केटचे शहर म्हणून जिल्ह्यात कुंभार पिंपळगांवचे नाव आहे. म्हणजेच या शहराची लोकसंख्या जवळपास 20 ते 25 हजार आहे. शिवाय जवळपासच्या 40 गावांचा केंद्रबिंदू कुंभार पिंपळगांव आहे. दररोज कोट्यावधी रूपयांची उलाढाल या शहरात होते. शिवाय बुधवारी आठवडी बाजारात स्थानिक नागरिकांसह किमान 40 गावातील नागरिक येत असतात. सदरील बाजाराच्या दिवशी अंदाजे 50 हजार किंवा त्यापेक्षा जास्त लोक येत असतात. याच कुंभार पिंपळगांव शहरात जवळपास 15 ते 20 सोन्या चांदीचे दुकाने आहेत. साधारण दुकाने नव्हे तर 5 ते 10 लाख रूपये फक्त डेकोरेशनवर खर्च केला असेल अशी सुसज्ज दुकाने आहेत.
GST कायद्याचा विसर !
सोने विक्री करतांना GST ची पावती देणे सर्व दुकानदारांवर बंधनकारक आहे, मात्र कुंभार पिंपळगांव येथे अपवाद सोडल्यास सर्व दुकानदार शक्यतो सोने अथवा दागिने विक्री करतांना साधी पावतीच देत आहेत. GST चे बीलच ग्राहकांना दिले जात नाही म्हटल्यावर GST भरलाच जात नाही असे म्हटल्याच चुकीचे ठरणार नाही. काही जण फक्त नावाला संबंधित विभागाकडे GST भरत असल्याचे भासवत आहेत, परंतू वर्षभरात विक्री केलेल्या सर्व ग्राहकांच्या GST बीलासहित GST भरण्यात येत नाही हे सुध्दा तेवढेच खरे आहे. फक्त नावाला GST भरत असल्याचे दाखवायचे आणि काही प्रमाणात टॅक्स किंवा रिटर्न सुध्दा भरत असल्याचे दाखवायचे यामुळे सत्य परिस्थिती बदलत नाही.
E-way बिलातून सूट आहे का !
प्राप्त माहितीनुसार एका शहरातून दुसऱ्या शहरात किंवा गावात 2 लाखाच्या पुढे सोने, चांदी अथवा दागिने घेवून जायचे सेल तर त्यासाठी E-way बील आवश्यक आहे. मात्र येथे सर्व नियम कायदे पायदळी तुडवले जात आहे. इतर शहरातून कुंभार पिंपळगावात कोट्यावधी रूपयांचे सोने, चांदी अथवा दागिने आणले जात असतांना येथील दुकानदारांना ई-वे बिलातून सूट देण्यात आलेली आहे का ? जर e-way बील जनरेट करूनच माल आणला जात असेल तर वर्षभरातील आणले जाणारे सर्व सोने, चांदी अथवा दागिने E-way बिलाच्या माध्यमातूनच आणले जातात का ? वर्षभराची बिले संबंधित दुकानदारांकडे आहे का ? याचा सखोल तपास होणे आवश्यक आहे.
सदरील दुकानदार जेथून सोने, चांदी अथवा दागिने होलसेल मध्ये विकत घेवून येतात, त्या ठिकाणी सुध्दा संबंधित विभागाने विचारपूस करणे आवश्यक आहे. कारण एखाद्या भरलेल्या ट्रान्सपोर्टच्या ट्रक मध्ये जेवढा माल असतो किंवा त्या माल किंवा वस्तुंची जेवढी किंमत होते तेवढ्या पैशाचे सोने अथवा दागिने तर एका खिशात बसतील. अर्थातच आता संबंधित दुकानदार हे एस.टी. बस मध्ये माल आणत नाहीत हे सांगायची आवश्यकता नसावी.
हॉलमार्क मधून सूट आहे का ?
हॉलमार्क म्हणजे त्या सोन्यावर केंद्र शासनाच्या BIS (Bureau of Indian Standards) विभागाचा चिन्ह असतो, सोन्याच्या शुद्धतेबाबत किंवा सोने किती कॅरेटचे आहे याबाबत क्रमांक असतो. हॉलमार्क असलेल्या दागिन्यांवरील क्रमांकावरून त्या दागिन्याची माहिती कोठेही पाहता येते, कोणत्याही प्रकारचे सोने अथवा दागिने विक्री करतांना संबंधित दुकानदाराने हॉलमार्किंग करणे शासनाने बंधनकारक केले आहे. सोने अथवा दागिने विक्री करतांना हॉलमार्किंगचा नियम संपूर्ण देशात असतांना जालना जिल्ह्याला आणि विशेष करून कुंभार पिंपळगावला यातून सूट देण्यात आलेली आहे का ? असा प्रश्नही यानिमित्ताने उपस्थित होत आहे.
गहाण सोन्याचे काय ?
कुंभार पिंपळगांवातील सोने चांदीच्या दुकानांवर मोठ्या प्रमाणात सोने गहान ठेवले जाते, मात्र सोने गहान ठेवण्यासाठी आवश्यक असलेला परवाना (लायसन्स) संबंधित दुकानदाराकडे आहे का ? प्राप्त माहितीनुसार अनेक दुकानदारांकडे असा परवानाच नाही, मग कोट्यावधी रूपयांचे सोने विना परवानाच गहाण ठेवण्यात येत आहे का ? आणि या व्यवहारातून मिळणाऱ्या बेहिशोबी व्याजाचा हिशोब शासनाकडे आहे का ? असाही प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.
कोट्यावधीची विक्री कशी ?
एवढ्या मोठ्या मार्केटच्या गावात सोन्या चांदींची उलाढाल पाहता शाळेतील लहान मुलगाही सांगेल की, मुलीच्या लग्नात किमान 2 ते 3 लाखांचे सोने खरेदी होत आहेत, वर्षभरात एका दुकानावर एक ग्राहक 2 ते 3 लाखांचे सोने, चांदी व दागिने खरेदी करत असेल तर वर्षभरात लग्नासाठीचे 100 ग्राहक त्या दुकानावर येत नाहीत का ?
एक ग्राहक सरासरी 2 लाख रूपये धरले तरी 100 ग्राहकांचे 2 कोटी होत आहेत, बाकी इतर सामान्य ग्राहकांचा व्यवहार पाहता 2 ते 3 कोटींची सहज विक्री होते. म्हणजेच वर्षभरात 4 ते 5 कोटींची विक्री दुकानांवर सहज होते, हे तर फक्त एका दुकाना संदर्भात एक उदाहरण आहे, सर्व दुकानांचा हिशोब धरला तर हा खेळ अंदाजे 100 कोटींच्या आसपास होत असल्याचे संबंधित अधिकाऱ्यांना दिसून येईल.
टॅक्सचे काय ?
ज्या अर्थी कोट्यावधी रूपयांची GST ची बिले ग्राहकांना दिली जात नाही त्या अर्थी विभागाकडे पूर्णपणे GST भरला जात नाही, अर्थातच कोट्यावधी रूपयांचा व्यवहार साध्या पावतींवर केला जात आहे. ज्या अर्थी GST ची बिले दिली जात नाही, त्या अर्थी या सोनेरी दुनियेत काळा पैसा (ब्लॅक मनी) मोठ्या प्रमाणावर जनरेट होत आहे. मागील काही वर्षांचा हिशोब काढल्यास अधिकारीही अवाक होतील. त्यामुळे फक्त GST विभागच नव्हे तर या प्रकरणी इनकम टॅक्स विभागालाही चौकशी करावी लागणार आहे.
तपास सुरू !
सदरील प्रकरण हे आता मर्यादित न राहता वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत गेले असून विविध माध्यमातून तपास होणार असल्याचे दिसत आहे. या सर्व प्रकाराबाबत संबंधित विभागाच्या एका सन्माननीय वरिष्ठ अधिकाऱ्यांनी यापूर्वीच चौकशी करू असे सांगितले होते, तर आता चौकशी सुरू झाल्याचे सुत्रांनी सांगितले, मात्र या गोपनीय तपासा बाबत अधिक तपशील देण्यास संबंधित अधिकाऱ्यांनी असमर्थता दर्शवली. याचाच अर्थ चौकशी पूर्ण झाल्यावर याबाबतची अधिक माहिती मिळू शकेल.