एल्गार न्यूज (परवेज पठाण)
धर्म जातीच्या राजकारणाचा आपल्या सर्वांवर कदाचित जास्तच प्रभाव आहे की काय असा प्रश्न अनेकदा पडतो, कारण ज्या प्रमाणे एखाद्या लाकडावर थेट पेटती काडी लावली तर काही फरक पडत नाही पण त्याच लाकडावर थोडं पेट्रोल टाकून काडी फेकली तर पटकन आगीचा भडका उडतो तशीच काही परिस्थिती दुर्दैवाने आपल्याकडे दिसून येत आहे.
निवडणूका संपल्यावर पुढील 4 ते चाडेचार वर्ष अपवाद सोडल्यास विशेष काही दिसून येत नाही मात्र निवडणुकीला 6 महिन्याचा कालावधी उरला की चित्र बदलायला लागते, त्यात कोणताही एक धर्म, जात दोषी नसते, तर त्या धर्म जातीच्या नावाने राजकारण करणारे लोक कोणाच्या तरी माध्यमातून आपली पोळी भाजून घेत असतात अथवा तशी सुरूवात करतात.
स्वातंत्र्यापूर्वी इंग्रजांनी फोडा आणि राज्य करा ही निती वापरून धर्मा-धर्मात, जाती-जातीत भांडणे लावून, द्वेष, तिरस्कार, जातीय तेढ निर्माण केला आणि असंख्य वर्ष आपल्यावर राज्य केले. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ही निती लुप्त होईल किंवा या नितीचा नायनाट होईल अशी आशा देशासाठी बलीदान देणाऱ्या आणि देशाला स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या शुरवीरांना होती. मात्र त्यांना काय माहित पुढील काळात (फोडा आणि राज्य करा) या नितीला तेल मिठ लावून अधिक घातक केले जाईल आणि देशहिताला बाजूला ठेवून राजकीय पोळी भाजून घेतली जाईल.
आपण कोणत्या दिशेने चाललो ?
छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्व जाती धर्माच्या नागरिकांना सोबत घेवून स्वराज्य निर्माण केले. महात्मा फुले, राजर्षी शाहु महाराज व भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी धर्म- जात-पात न पाहता सर्व धर्म, सर्व जातींच्या कल्याणासाठी प्रयत्न केले. तसेच या मान्यवरांसह इतरही सर्व महापुरूष व समाज सुधारकांनी धर्म, जात-पात न पाहता सर्व समाजासाठी आयुष्य पणाला लावले.
माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांनी व त्यांच्या प्रमाणेच इतर मान्यवरांनी आपल्या देशांच्या संरक्षणासाठी मिसाईल बनवले, विविध मान्यवर शास्त्रज्ञांनी प्रक्षेपणास्त्र, सॅटेलाईट व अनेक संरक्षण साहित्य निर्माण केले, दुश्मन असलेल्या काही बाह्य शक्तींविरूध्द लढण्यासाठी सक्षम बनवले. ज्ञात अज्ञात अनेक मान्यवरांनी, समाजसुधारकांनी स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्यानंतरही अनेकांनी आपले जीवन देशहितासाठी अर्पण केले. परंतू आपल्याला त्यांच्या त्यागाचा, कष्टाचा आणि समाज व देशहितासाठी केलेल्या कार्याचा वारंवार विसर पडतोय हे दुर्दैवाने नमूद करावे लागत आहे.
फोडा आणि राज्य करा !
इंग्रजांनी आपल्या देशावर अनेक वर्ष फोडा आणि राज्य करा या नितीनुसार राज्य केले, इंग्रज भारतातून गेले परंतू त्यांची निती काही राजकारण्यांच्या माध्यमातून अजूनही जिवंत आहे. सगळा दोष राजकारण्यांचा नाही, आपणही तेवढेच दोषी आहोत, कारण आपल्या मनावर धर्म-जातीच्या द्वेषाचे पेट्रोल थोडे टाकले तरी काडी लावायची आवश्यकताच पडत नाही. आपण एवढे असंवेदनशील झालो आहोत की धर्म जातीचे पेट्रोल आपल्या मानसिकतेवर पडल्याबरोबर एवढा भडका उडतो आणि गुण्यागोविंदाने राहणाऱ्या माणुसकीला, आपुलकीला आणि स्वत:च्या मेंदूने विचार करण्याच्या क्षमतेला जाळून टाकतो.
अजून किती वर्ष ?
काही राजकारणी मंडळींकडून आपल्याला धर्म-जातीच्या नशेची गोळी वारंवार दिली जात आहे, कारण राजकारणी मंडळींनी धर्म-जातीच्या द्वेषाची ही गोळी दिली नाही तर आपण त्यांना रस्ते, पाणी, वीज, शिक्षण, आरोग्य, नोकरी, रोजगार अशा विविध मुलभूत प्रश्नांवर तुम्ही काय केले हा प्रश्न विचारू शकतो. परंतू त्यांच्याकडे या प्रश्नांचे उत्तर नसेल तर ते सरळ धर्म-जातीच्या द्वेषाची गोळी आपल्याला देवून टाकतात आणि आपल्याला समोरचा धर्म, जात वाईट वाटू लागते, असुरक्षिततेची भावना निर्माण होते, दुसऱ्या धर्म-जातीपासून धोका असल्याचा भास होतो, त्यावेळेस समोरच्या धर्म-जातीपासून आम्ही संरक्षण करू फक्त आम्हाला मत द्या आणि गोळ्या घेत रहा अशी निती राजकारणी वापरत राहतात. मग काय आपण ही गोळी निवडणुका होईपर्यंत घेत राहतो, एकदा निवडणुका संपल्यावर आपण आपल्या कामाला लागतो आणि पुढच्या निवडणुकीला धर्म-जातीच्या गोळ्या पुन्हा तयारच असतात.
कोणताही धर्म चुकीचा नाही !
आपण आपलाही धर्मग्रंथ वाचावा आणि इतर धर्मियांचाही ग्रंथ वाचावा तेव्हा लक्षात येईल की, कोणताही धर्म चुकीचा नाही आणि कोणत्याही धर्मात इतरांचा द्वेष करणे सांगितलेले नाही, कोणत्याही धर्मात इतरांना त्रास व्हावा असे अनुकरण करण्यास सांगितलेले नाही, कोणत्याही धर्मात चुकीची शिकवण दिलेली नाही. फक्त काही राजकरण्यांनी त्यांच्या सोयीने ध चा म अर्थ काढून आणि फोडा व राज्य करा या नितीचा वापर करून आपल्याला भ्रमित केले आहे.
थोडा तरी विचार करा !
दररोज प्रत्येक जाती-धर्माच्या लोकांसोबत आपण उठतो, बसतो, सोबत जेवण करतो, लग्नकार्यात सहभागी होतो, सुख-दुखात धावून जातो, अडीअडचणीला कामी येतो त्यावेळेस समोरचा व्यक्ती कोणत्या धर्माचा, कोणत्या जातीचा आहे हा प्रश्न पडत नाही. त्यावेळेस त्याच्यापासून धोका दिसत नाही, त्यावेळेस ते वाईट दिसत नाही, भावा-भावासारखे मित्र म्हणून राहतांना काही अडचण येत नाही. मग कोणी धर्माच्या नावाने द्वेषाची गोळी दिली की अचानक असे काय होते की समोरचा व्यक्ती वाईट वाटू लागतो, त्याचा धर्म चुकीचा वाटू लागतो, आपला धर्म श्रेष्ठ आणि दुसऱ्याचा धर्म तुच्छ वाटू लागतो, असे का ? कारण धर्माच्या नावाने कोणी द्वेषाची गोळी दिली की आपण आपला मेंदू दुसऱ्याकडे गहाण ठेवतो आणि द्वेषाची गोळी देणारा आपला मेंदू नियंत्रित करतो.
जागे व्हा !
निवडणुका जवळ आल्या आहेत, कोणाला मतदान करायचे खुशाल करा, कोणत्या राजकीय पक्ष, संघटनेसोबत काम करायचे खुशाल करा, आपल्या धर्माचा, जातीचा अभिमानही बाळगा त्यासही कोणाची हरकत असण्याचे कारण नाही. परंतू कोणी धर्माच्या नावाने किंवा जातीच्या नावाने आपसात भांडणे लावत असेल, द्वेष पसरवत असेल, जातीय तेढ निर्माण करत असेल, तिरस्काराची भावना निर्माण करत असेल तर त्याच्यापासून नक्कीच दूर रहा. कारण म्हातारी मेल्याचं दुख नाही पण काळ सोकावतोय… आपलं तर झालं गेलं, परंतू आता किमान मुला-बाळांच्या भविष्याचा विचार करून पुढील वाटचाल करा… अडचणी, समस्या सर्वांसमोरच असतात, परंतू त्यातूनही कसा मार्ग काढता येईल याचा विचार करून प्रगतीच्या दिशेने पाऊल टाका, नसता येणारी पिढी नव्हे तर आपल्याच मुला-बाळांची पिढी आपल्याला माफ करणार नाही….
जय हिंद… जय महाराष्ट्र…
परवेज पठाण,
संपादक, एल्गार न्यूज