Your Alt Text

भारताच्‍या सर्वांगिण विकासासाठी आणि सर्वसामान्‍य जनतेच्‍या जीवनात सुख समृध्‍दी आणण्‍यासाठी प्रत्‍येकाच्‍या प्रयत्‍नांची गरज !

व्‍हाट्सअॅप ग्रुप जॉईन करा.

एल्‍गार न्‍यूज (परवेज पठाण) :-
आपल्‍या भारत देशाला 15 ऑगस्‍ट 1947 रोजी स्‍वातंत्र्य मिळाले, म्‍हणजेच आजरोजी आपल्‍याला स्‍वातंत्र्य मिळून 77 वर्षे पूर्ण झाली आहेत. आपल्‍या देशाला हे स्‍वातंत्र्य काही सहज मिळालेले नाही, यासाठी कित्‍येक महान क्रांतीकाऱ्यांनी आपले रक्‍त सांडले आहे, कित्‍येकांनी आपल्‍या निधड्या छातीवर इंग्रजांच्‍या गोळ्या झेलल्‍या आहेत. म्‍हणजेच त्‍यांनी आपले संपूर्ण जीवन देशासाठी अर्पण केले आहे.

देशावर आपले प्रेम आहे परंतू ते उफाळून येतं फक्‍त 15 ऑगस्‍ट आणि 26 जानेवारीला असं म्‍हटल्‍यास वावगं ठरणार आहे. इतर दिवशी देशासाठी आपण काय करतो ? या प्रश्‍नाचे उत्‍तर आपल्‍यापैकी अनेकांकडे नाही. स्‍वत:च्‍या जगण्‍यामध्‍ये देशासाठी जगणं आपण विसरून गेलो आहोत. त्‍यामुळे अन्‍याय, अत्‍याचार, भ्रष्‍टाचार अशा विविध विकृतींनी डोकं वर काढले आहे. देशाच्‍या सर्वांगिण विकासासाठी आणि सर्वसामान्‍य जनतेच्‍या जीवनात सुख समृध्‍दी आणण्‍यासाठी प्रत्‍येकानेच प्रयत्‍न करणे आवश्‍यक झाले आहे.

Tatya Final 001

देशाचा विकास बदलांमुळे शक्‍य होतो, बदल हवाय हे दुसऱ्यांना सांगण्‍यापेक्षा आपण स्‍वत:मध्‍ये बदल केला तर परिवर्तन नक्‍कीच घडू शकते, फक्‍त दुसऱ्यांना दोष देवून चालणार नाही, आपण सुध्‍दा या देशाचे जबाबदार नागरिक आहोत आणि त्‍यामुळे आपलेही काही कर्तव्‍य आहे याची जाण आपण ठेवणे आवश्‍यक आहे.

किमान खारीचा वाटा !

देशाचा सर्वांगिण विकास करायचा असेल आणि देशाला महासत्‍ता बनवायचे असेल तर आपल्‍या सर्वांना सिंहाचा शक्‍य नसेल तर किमान खारीचा वाटा तरी उचलणे आवश्‍यक आहे. आपण ज्‍या क्षेत्रात काम करत आहोत त्‍या क्षेत्राचा फायदा तळागाळातील नागरिकांना पोहोचवण्‍याचा प्रत्‍येकाने जरी प्रयत्‍न केला तरी देशहितासाठी ते फायद्याचे ठरेल.

ग्रामीण विकासासाठी योगदान !

ग्रामीण भागातील असंख्‍य नागरिक आजही अनेक सोयी सुविधांपासून वंचित आहेत, अनेकांना आपल्‍या समस्‍या कोठे मांडाव्‍यात, आपल्‍या समस्‍यांचे निराकरण कसे करावे याची माहिती नसते. आपण सदरील समस्‍यांचे निराकरण करण्‍यासाठी त्‍यांना थोडं सहकार्य जरी केलं तरी या समस्‍या सुटण्‍यास बऱ्याच अंशी हातभार लागेल. तसेच जास्‍त काही करणे शक्‍य नसेल तर किमान जे समाजहिताचे काम करतात त्‍यांना थोडं सहकार्य केले तरी समस्‍या सुटण्‍यास नक्‍कीच हातभार लागेल.

सर्वांगिण विकासासाठी प्रयत्‍न !

आपल्‍या सर्वांना चांगल्‍या दर्जाचे शिक्षण, चांगल्‍या आरोग्‍य सुविधा, प्रत्‍येक गाव वाड्या वस्‍त्‍यांपर्यंत चांगले रस्‍ते, शुद्ध पाणी, वीज, रोजगार या सारख्‍या सोयी सुविधांसाठी प्रयत्‍न करावे लागणार आहेत. फक्‍त कोणी एक व्‍यक्‍ती देशात परिवर्तन करू शकत नाही, त्‍यासाठी आपल्‍या सर्वांना देशहित डोळ्यासमोर ठेवून प्रयत्‍न करणे आवश्‍यक आहे. सर्वांनी सामुहिक प्रयत्‍न केल्‍यास देशाची प्रगती झपाट्याने होण्‍यास आणि देश महासत्‍ता होण्‍यास वेळ लागणार नाही.

आपल्‍या सर्वांना स्‍वातंत्र्य दिनानिमित्‍त मन:पूर्वक शुभेच्‍छा…


Matin Final 001
व्‍हाट्सअॅप ग्रुप जॉईन करा.

Leave a Comment

error: Content is protected !!