एल्गार न्यूज (परवेज पठाण) :-
घनसावंगी तालुक्यातील जांबसमर्थ येथील शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतातील शेता रस्ता मोकळा करून द्यावा म्हणून वारंवार प्रशासनाला निवेदन दिले परंतू कुठल्याही प्रकारची कार्यवाही झाली नाही त्यामुळे संबंधित शेतकऱ्यांनी दि.12 रोजी पासून घनसावंगी तहसील समोर आमरण उपोषण सुरू केले आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, घनसावंगी तालुक्यातील जांबसमर्थ येथील शेतकऱ्यांना गुणानाईक तांड्याकडे जाण्यासाठी पूर्वीपासूनच शेत रस्त्यासह गाव रस्ता आहे. सदरील रस्ता मागील काळात अडवण्यात आला आहे, त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांना जाण्यासाठी रस्ताच नाही. त्यामुळे सदरील शेतकऱ्यांना अनंत अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे शेतकऱ्यांनी प्रशासनाला दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे.
प्रशासनाची अडचण काय ?
प्रशासनाने सदरील शेतकऱ्यांना गट मोजणी किंवा शेत रस्ता मोजणीसाठी फी भरण्याबाबत कळविले होते, परंतू शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार सदरील रस्ता हा शासनाचा सार्वजनिक शेतरस्ता असून त्याची मोजणी फी आम्ही का भरावी ? शेतकऱ्यांकडून मोजणी फी घेणे योग्य नाही असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
अद्याप निर्णय नाही !
सदरील शेतकऱ्यांनी वरिष्ठ पातळीवर सुध्दा पाठपुरावा करून सदरील समस्या त्यांच्याकडे मांडली आहे, एवढंच नव्हे तर शेतकऱ्यांनी सदरील शेत रस्त्याच्या समस्ये बाबत निवेदन मंत्रालया पर्यंत सुध्दा दिले आहे. परंतू महसूल प्रशासनाच्या वतीने अद्याप पर्यंत कोणत्याही प्रकारची कार्यवाही करण्यात आलेली नाही.
उपोषणाचा निर्णय !
तहसील प्रशासनापासून मंत्रालया पर्यंत निवेदन देवूनही कोणत्याही प्रकारची कार्यवाही होत नसल्याने शेतकऱ्यांनी अखेर आमरण उपोषण करण्याचा निर्णय घेतला असून दि.12 पासून शेतकरी तहसील समोर उपोषणाला बसले आहेत. सदरील उपोषणाला सामाजिक कार्यकर्ते किशोर मुनेमाणिक, अक्षय तांगडे, प्रवीण नेब, त्र्यंबक नेब, प्रभाकर नेब, बाळासाहेब नाटकर, नवनाथ मोगरे यांच्यासह इतर शेतकरी तहसील समोर बसले आहेत.
स्वातंत्र्य दिनाच्या 2 दिवस आधी शेतकऱ्यांना तहसील समोर आमरण उपोषण करण्याची वेळ यावी हे प्रशासनाला पटण्यासारखे आहे का ? किंवा प्रशासनाने सदरील समस्या एवढ्या दिवसात सोडवायला पाहीजे नव्हती का ? असा सवाल सुध्दा शेतकरी करत आहेत. प्रशासन किमान आता तरी गांभीर्यपूर्वक विचार करून स्वातंत्र्य दिनाआधी शेतकऱ्यांची ही समस्या सोडवते का हेच पाहणे महत्वाचे ठरणार आहे.