Your Alt Text

ज्ञानराधा प्रकरणात हजारो कोटींची संपत्‍ती जप्‍त ! ईडीच्‍या एंट्रीमुळे खातेदारांना येत्‍या काळात काही दिलासा मिळणार का ?

व्‍हाट्सअॅप ग्रुप जॉईन करा.

एल्‍गार न्‍यूज (परवेज पठाण) :-
ज्ञानराधा पतसंस्‍थेचे कामकाज मागील काळात बंद पडल्‍यामुळे हजारो खातेदारांचे कोट्यावधी रूपये पतसंस्‍थेत अडकले असून खातेदार हवालदिल झाले आहेत. अनेकांनी आपल्‍या कष्‍टाचे पैसे या पतसंस्‍थेत जमा केले होते परंतू पंतसंस्‍था बंद पडल्‍यामुळे हजारो खातेदारांना काय करावे हा प्रश्‍न पडला आहे.

खातेदारांना आपले पैसे मिळत नसल्‍याचे दिसून येत असल्‍याने खातेदारांनी ज्ञानराधाचे सुरेश कुटे यांच्‍यावर राज्‍यभरात विविध ठिकाणी गुन्‍हे दाखल केले आहेत. आतापर्यंत आर्थिक गुन्‍हे शाखा या प्रकरणी तपास करत होती, परंतू आता या कोट्यावधी रूपयांच्‍या प्रकरणात ईडी (ED) ची एंट्री झाली आहे.

कार्यालयांवर ईडी च्‍या धाडी !

शुक्रवारी मध्‍यरात्री ईडीने छत्रपती संभाजीनगर येथील विभागीय कार्यालयावर छापा मारला असून पथकाने महत्‍वाची कागदपत्रे जप्‍त केली असून अनेक दस्‍तावेज, संगणक व इतर गोष्‍टींची तपासणी रात्री उशीरापर्यंतं केल्‍याचे समोर आले आहे. तसेच बीड येथील मुख्‍य कार्यालयाची सुध्‍दा शुक्रवारी दिवसभर चौकशी झाल्‍याचे दिसून येत आहे. शिवाय राज्‍यभरात तपास सुरू असल्‍याचे दिसत आहे.

संपत्‍ती जप्‍त !

प्राप्‍त माहितीनुसार सुरेश कुटे व त्‍यांच्‍या सहकाऱ्यांची मिळून जवळपास 5 हजार 765 कोटीची संपत्‍ती जप्‍त करण्‍यात आल्‍याची माहिती समोर आली आहे. यामध्‍ये कंपनी, जमीन, इमारती यंत्रसामुग्री व इतर संपत्‍तीचा समावेश असल्‍याचे सांगण्‍यात येत आहे.

खातेदार हवालदिल !

हजारो कोटींच्‍या सदरील घोटाळ्यामुळे असंख्‍य गोरगरीब व कष्‍टकरी नागरिकांना अनंत अडचणींचा सामना करावा लागत आहे, कोणी लग्‍नासाठी, कोणी घर बांधणीसाठी, कोणी व्‍यवसायासाठी तर कोणी इतर आवश्‍यक कामासाठी पैसे या पतसंस्‍थेत ठेवले होते, परंतू सदरील पतसंस्‍थे मध्‍ये झालेल्‍या या घोटाळयामुळे सर्वच खातेदार हवालदिल झाले आहेत.

दिलासा मिळणार का ?

आतापर्यंत आर्थिक गुन्‍हे शाखेकडे असलेला तपास आता ईडीकडे गेल्‍याचे दिसून येत आहे. त्‍यातच सुरेश कुटे व त्‍यांच्‍या सहकाऱ्यांची संपत्‍ती जप्‍त करण्‍यात आली असल्‍यामुळे भविष्‍यात सदरील संपत्‍ती विक्री करून खातेदारांचे पैसे परत मिळणार का ? असा सवाल विचारला जात आहे. कारण असंख्‍य खातेदार नागरिकांचे भवितव्‍य या पैशांवर अवलंबून आहे. प्रकरण न्‍यायप्रविष्‍ट असले तरी शासनाने लवकरात लवकर खातेदारांचे पैसे कसे मिळतील यादृष्‍टीने प्रयत्‍न करावेत अशी अपेक्षा नागरिक व्‍यक्‍त करत आहेत.


इतर बातम्‍या खाली पहा…

व्‍हाट्सअॅप ग्रुप जॉईन करा.

Leave a Comment

error: Content is protected !!