Your Alt Text

शासनाच्‍या विविध योजनांची माहिती देण्‍यासाठी राज्‍यात 50 हजार योजना दूतांची नियुक्‍ती होणार ! युवकांना 10 हजार रूपये महिना मिळणार !

व्‍हाट्सअॅप ग्रुप जॉईन करा.

एल्‍गार न्‍यूज (परवेज पठाण) :-
महाराष्‍ट्र शासनाच्‍या विविध योजनांचा प्रचार व प्रसिध्‍दी करणे व त्‍यांचा जास्‍तीत जास्‍त नागरिकांना लाभ मिळण्‍याच्‍या दृष्‍टीने त्‍यांना सहाय्य करण्‍यासाठी राज्‍यात 50 हजार मुख्‍यमंत्री योजना दूत नियुक्‍त केले जाणार आहेत.

महाराष्‍ट्र शासनाच्‍या माहिती व जनसंपर्क महासंचालनालय आणि मुख्‍यमंत्री जनकल्‍याण कक्ष यांच्‍या मार्फत संयुक्‍तपणे “मुख्‍यमंत्री योजनादूत” कार्यक्रम राबविला जाणार आहे. राज्‍यात कार्यरत प्रशासकीय यंत्रणेला मदत करण्‍याकरीता मुख्‍यमंत्री योजनादूत नेमण्‍याचा निर्णय शासनाने घेतला आहे.

पात्रता काय ?

योजना दूतसाठी सदरील व्‍यक्‍तीचे वय 18 ते 35 दरम्‍यान असावे, कोणत्‍याही शाखेच्‍या पदवीधराला यासाठी अर्ज करू शकतो, उमेदवाराला संगणकाचे ज्ञान आवश्‍यक असून त्‍याच्‍याकडे अद्यावत मोबाईल असणे आवश्‍यक आहे. तसेच सदरील उमेदवार महाराष्‍ट्राचा रहिवाशी असावा. उमदेवाराकडे आधारकार्ड असावे व त्‍यांच्‍या नावाचे बँक खाते आधारशी संलग्‍न असणे आवश्‍यक आहे.

आवश्‍यक कागदपत्रे

1) विहीत नमुन्‍यातील मुख्‍यमंत्री योजनादूत कार्यक्रमासाठी केलेला ऑनलाईन अर्ज.
2) आधारकार्ड
3) पदवी उत्‍तीर्ण असल्‍याबाबत पुरावा म्‍हणून कागदपत्रे किंवा प्रमाणपत्र.
4) अधिवासाचा दाखला.
5) वैयक्तिक बँक खात्‍याचा तपशील.
6) पासपोर्ट साईज फोटो.
7) हमीपत्र (ऑनलाईन अर्जासोबतच्‍या नमुन्‍यामधील)

योजनादूताची कामे

योजनादूत संबंधित जिल्‍हा माहिती अधिकारी यांच्‍या संपर्कात राहून जिल्‍ह्यातील योजनांची माहिती घेतील, प्रशिक्षित योजनादूतांनी त्‍यांना नेमून दिलेल्‍या ठिकाणी समक्ष जावून त्‍यांना ठरवून दिलेले काम पार पाडणे त्‍यांच्‍यावर बंधनकारक राहणार आहे. योजनादूत ग्राम पातळीवरील यंत्रणांशी समन्‍वय करून शासनाच्‍या योजनांची माहिती घरोघरी पोहोचवण्‍यासाठी प्रयत्‍न करतील. तसेच दर दिवशी केलेल्‍या कामाचा विहीत नमुन्‍यातील अहवाल तयार करून तो ऑनलाईन अपलोड करतील.

कुठे नियुक्‍ती होणार ?

राज्‍यात प्रत्‍येक ग्रामपंचायतीसाठी 1 व शहरी भागात 5000 लोकसंख्‍येसाठी 1 योजनादूत या प्रमाणात 50 हजार योजनादूतांची निवड करण्‍यात येणार आहे. सदरील योजना दुतास प्रत्‍येकी 10 हजार रूपये एवढे मानधन दिले जाणार आहे. सदरील नियुक्‍ती ही फक्‍त 6 महिन्‍यांकरीता राहणार आहे. पुढे हा कालावधी वाढवला जाणार नाही असे जीआर मध्‍ये नमूद करण्‍यात आले आहे.

संमिश्र प्रतिक्रिया !

शासनाने मुख्‍यमंत्री योजनादूत हा उपक्रम सुरू करून विविध योजनांची माहिती घरोघरी पोहोचवण्‍यासाठी योजनादूत नेमण्‍याचा निर्णय घेतला आहे. मात्र याबाबत संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. काही नागरिकांच्‍या मते उपक्रम चांगला असून नागरिकांनाही विविध योजनांची माहिती मिळेल व संबंधित युवकांनाही किमान 6 महिन्‍याकरीता का असेना रोजगार मिळेल अशी प्रतिक्रिया दिली. तर 10 हजार मानधन कमी असून कुठलाही प्रवास खर्च किंवा भत्‍ता वेगळा मिळणार नाही, घरोघरी जावून योजनांची माहिती देण्‍यासह कामाचे स्‍वरूप पाहता हे मानधन कमी असल्‍याची प्रतिक्रिया सुध्‍दा काही युवकांनी दिली आहे.


इतर बातम्‍या खाली पहा…

व्‍हाट्सअॅप ग्रुप जॉईन करा.

Leave a Comment

error: Content is protected !!