एल्गार न्यूज (परवेज पठाण) :-
ज्या भागात चांगल्या दर्जाचे रस्ते असतात त्या भागाचा विकास जलदगतीने होतो असे म्हटले जाते, परंतू चांगले रस्ते झाले म्हणजे नियम कायदे पायदळी तुडवून मनमर्जीप्रमाणे वाहने चालवण्याचा परवाना मिळत नाही. सर्वसामान्य नागरिकांच्या जीवाची काही किंमत आहे का नाही ? रस्ता चांगला झाला म्हणजे रस्ता आपल्या बापाचाच समजून व भरधाव वेगाने वाहने चालवून लोकांचा जीव घेणार असतील तर अशा वाहनधारकांवर कठोर कारवाई का होवू नये ? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, घनसावंगी तालुक्यातील सिंदखेड जवळ (अंबड-पाथरी रोड) दि.05 रोजी एका निष्पाप नागरिकाचा अपघात होवून जीव गेला. या रस्त्यावर अपघात होवून मृत्यूमुखी पडण्याची ही काही पहिली घटना नाही, याआधीही अनेक जणांना याच रस्त्यावर भरधाव वेगाने जाणाऱ्या मोठ्या वाहनांनी धडक दिल्यामुळे जीव गमवाला लागला आहे. अंबड-पाथरी महामार्ग हा कुंभार पिंपळगाव शहरातून गेलेला आहे, वाहनधारक भरधाव वेगाने अक्षरश: वर्दळीच्या चौकातून सुध्दा जातांना प्रचंड वेगाने वाहने चालवित आहेत.
ज्या भागांमध्ये अॅक्सीडेंट शब्द कधी ऐकायला मिळत नव्हता त्या भागात किंवा रस्त्यावर आठवडा उलटत नाही तोच अॅक्सीडेंट किंवा अपघात शब्द कानावर पडत आहेत. कुंभार पिंपळगावातून गेलेल्या अंबड पाथरी या महामार्गावर अनेक ठिकाणी शाळा, महाविद्यालये, विविध बँका, कार्यालये, पेट्रोल पंप आहेत तसेच इतर गावांतून येणारे मार्ग आहेत, टी पॉईंट किंवा चौक आहेत, परंतू भरधाव वेगाने जाणारी मोठी वाहने काहीच न पाहता अक्षरश: मस्तवालपणे नियम कायदे पायदळी तुडवत भरधाव वेगाने वाहने चालवून लोकांचा जीव घेत आहेत.
सगळेच चुकीचे आहेत असे कोणाचेच म्हण्णे नाही, परंतू जे नियम कायद्याला बाजुला सारून प्रचंड वेगाने वाहने चालवित असतील, नियमांच्या चिंधड्या उडवत भरधाव वेगाने वाहने चालवून निष्पाप लोकांचे बळी घेत असतील तर अशा वाहनधारकांवर कठोर कारवाई व्हायला नको का ? वारंवार अपघात होवून लोकांचा नाहक जीव जात असेल, मृत्यूमुखी पडणाऱ्या व्यक्तीचे कुटुंब उघड्यावर येणार असेल, त्यांच्यासाठी जगणे अवघड होवून जात असेल तर मृत्यूला कारणीभुत ठरणाऱ्या वाहनधारकांवर कठोर कारवाई व्हायलाच पाहिजे असे ठाम मत नागरिक व्यक्त करत आहेत.
यंत्रणाही जबाबदार !
नियम कायदे कितीही केले तरी जो पर्यंत लोकांमध्ये या कायद्याचा धाक निर्माण होत नाही तो पर्यंत हे नियम कायदे कुचकामीच ठरणार आहेत. रस्त्यावर होणारे अपघात रोखण्यासाठी अनेक नियम कायदे आहेत परंतू त्यासाठी असलेली यंत्रणा झोपेचं सोंग घेणार असेल, बसल्या जागी खुर्च्या गरम करून ढेकरं घेणार असेल तर गुन्हेगारांवर वचक निर्माण होणार कसा ? निष्पाप लोकांचे बळी घेणाऱ्यांना कुठलीच शिक्षा होणार नसेल तर संबंधित यंत्रणा काय कामाची ? असा सवालही यानिमित्ताने उपस्थित होत आहे.
अपघाताला अनेक कारणे !
कुंभार पिंपळगांव परिसरातून जाणाऱ्या अंबड-पाथरी हायवेवर आतापर्यंत अनेक अपघात झाले आहेत, या बहुतांश अपघातामध्ये मोठ्या वाहनाने मोटारसायकलला धडक दिल्यामुळे मोटारसायकल चालक व्यक्तींचे जीव गेले आहेत. या परिसरात किंवा इतर मार्गावरही अनेकदा असे दिसून आले आहे की, धडक देणाऱ्या मोठ्या वाहनावरील चालकाने एक तर दारू घेतलेली असते किंवा त्याला भरधाव वेगाने व नियम मोडून वाहन चालवायची सवय असते. मात्र त्या मोठ्या वाहनधारकाच्या एका चुकीमुळे एक कुटुंब उद्धवस्त होत आहे. सगळेच वाहनधारक चुकीचे नसतात हे मान्य परंतू नियम कायद्याचे पालन केल्याशिवाय आणि यंत्रणेने गांभीर्यपूर्वक लक्ष दिल्याशिवाय हे सत्र थांबणार नाही.
कारवाई नाहीच !
कुंभार पिंपळगांव शहरातून गेलेल्या अंबड-पाथरी रोडवर विशेष करून घनसावंगी ते आष्टी या रस्त्यावर आतापर्यंत अनेक अपघात होवून अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे, परंतू तरीही आरटीओ विभाग, पोलीस प्रशासन कोणत्याही प्रकारची कारवाई करतांना दिसून येत नाही. वाहने प्रचंड गतीने कशी काय धावत आहेत ? नियमाची पायमल्ली का होत आहे ? लोकांचे जीव का जात आहेत ? याचा तपास कोणी करणार आहे का नाही. महिना पंधरा दिवसात एखादी सुध्दा कारवाई होत नसेल आणि आरटीओ विभाग किंवा पोलीस प्रशासन फक्त बघ्याची भुमिका घेणार असेल तर यंत्रणा गेंड्याच्या कातडीची झाली आहे असं म्हणायला हरकत नाही.
किमान आता तरी जागे व्हा !
आरटीओ विभाग आणि पोलीस प्रशासनाने नियम कायदे पायदळी तुडवून भरधाव वेगाने वाहने चालवणाऱ्यांवर कठोर कारवाई करणे क्रमप्राप्त झाले आहे. कारण संबंधित यंत्रणा आता सुध्दा जागी होणार नसेल तर पुन्हा अशाच प्रकारे एक एक करून निष्पाप लोकांचा जीव गेल्याशिवाय राहणार नाही.