एल्गार न्यूज (परवेज पठाण) :-
घनसावंगी तालुक्यातील कुंभार पिंपळगांव हे शहर परिसरातील 30 ते 40 गावांचे केंद्रबिंदू आहे. विविध ठिकाणाहून येणाऱ्या प्रवाशांसह परिसरातील प्रवाशांना येथील बस स्थानकात आवश्यक अशा सुविधा मिळत नसल्याने येथील ग्रामविकास युवा मंचच्या वतीने राज्य परिवहन महामंडळाच्या अधिकाऱ्यांना निवेदन देवून समस्या सोडवण्याची मागणी करण्यात आली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, नागरिकांच्या सहकार्याने ग्रामविकास युवा मंचच्या माध्यमातून कुंभार पिंपळगांव येथील बस स्थानकात विविध प्रयत्न करून अनेक सुधारणा करण्यात आल्या आहेत, मात्र लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांच्या माध्यमातून सोडवता येतील अशा काही समस्या आजही प्रलंबित आहेत त्या सोडवण्याच्या दृष्टीने ग्रामविकास युवा मंचच्या वतीने राज्य परिवहन महामंडळाच्या अधिकाऱ्यांना निवेदन देवून विविध मागण्या करण्यात आल्या आहेत.
सदरील मागण्यांमध्ये वाहतुक नियंत्रक अधिकारी यांची कायमस्वरूपी नियुक्ती करणे, बस स्थानकात सफाई कामगार, वॉचमेन व होमगार्डची नियुक्ती करणे, सर्व बसेस बस स्थानकात येण्यासाठी संबंधितांना आदेशीत करणे, बस स्थानकात सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे, शासनाच्या विविध योजनांची माहिती मिळावी यासाठी LCD टिव्ही बसविणे, वृक्षारोपन केल्यास जणावरांपासून संरक्षणासाठी वृक्षांना जाळी बसविणे, बस स्थानकात अर्धवट नालीचे बांधकाम पूर्ण करणे, प्रवाशांची अडचण लक्षात घेवून तातडीने शौचालय बांधणे, विविध मार्गांवर लांब पल्ल्याच्या गाड्या सुरू करणे, विविध आगारप्रमुखांनी समन्वय साधून लांब पल्ल्याच्या गाड्या सुरू करणे, ज्या वेळेत गाड्या नाहीत त्या वेळेत गाड्या अथवा बसेस सुरू करणे अशा विविध मागण्या निवेदना द्वारे करण्यात आल्या आहेत.
सदरील निवेदनानुसार असलेल्या विविध समस्यांवर तोडगा काढण्याचे आश्वासन महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी दिल्याचे ग्रामविकास युवा मंचच्या वतीने सांगण्यात आले आहे. यावेळी रा.प. महामंडळाचे प्रल्हाद घुले-विभाग नियंत्रक, दिगंबर जाधव- विभाग वाहतूक अधिकारी, सुरेंद्र तांदळे – यंत्र अभियंता, प्रदीप जोशी -स्थापत्य अभियंता, रणवीर कोळपे – आगार व्यवस्थापक तसेच ग्राम विकास युवा मंच चे प्रकाश बिलोरे, भागवत राऊत, संजय गोफने, वैभव कुलकर्णी यांच्या सह अनेकांची उपस्थिती होती.