एल्गार न्यूज (परवेज पठाण) :-
वर्षानुवर्षे सर्वसामान्य नागरिकांना मुलभूत सुविधा कधी मिळतील याची वाट पहावी लागत असेल आणि स्वातंत्र्याच्या 76 वर्षानंतरही शाळकरी मुलांना चिखल तुडवत शाळेत जावे लागत असेल तर ही खूप मोठी शोकांतिकाच म्हणावी लागेल.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, कुंभार पिंपळगाव (ता.घनसावंगी, जि.जालना) येथील जुन्या पोलीस चौकी समोरील रस्ता (तत्कालीन डॉ.खान यांच्या दवाखान्याच्या बाजुचा रस्ता) अद्यापही चिखलमयच आहे, या भागात राहणाऱ्या असंख्य विद्यार्थ्यांना पावसाळ्यात चिखल तुडवत शाळेत जावे लागत आहे. अनेकदा शाळकरी लहान मुले-मुली पाय घसरून पडत आहेत.
रस्त्यावरून नेहमी वर्दळ !
सदरील रस्त्याच्या दोन्ही बाजुला असंख्य घरे आहेत, शिवाय याच रस्त्याला लागून झोपडपट्टी सुध्दा आहे. सदरील रस्ता पुढे गेल्यावर पांदन रस्त्यात रूपांतरीत होतो, मात्र जिथपर्यंत घरे आहेत, वस्ती आहे तिथपर्यंत रस्ता करायला काय अडचण आहे असा सवाल नागरिक विचारत आहेत. महिला व लहान मुलांसह वयोवृध्द नागरिकांना या रस्त्यावरून ये-जा करतांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.
या भागात राहणाऱ्या असंख्य कुटुंबातील नागरिकांना जीवनावश्यक वस्तू खरेदीसाठी असो, दवाखान्यात जाण्यासाठी असो, किंवा इतर कामानिमित्त असो मुख्य रस्त्यावर म्हणजेच बस स्थानक रोडवर येण्यासाठी हाच प्रमुख रस्ता आहे. त्यामुळे हा रस्ता लवकरात लवकर चांगल्या दर्जाचा होणे अत्यंत गरजेचे आहे.
जबाबदारी कोणाची ?
केंद्र आणि राज्य शासनाचे कोट्यावधी रूपयांचे फंड ग्रामीण विकासासाठी येत असतात, तरीही अशा प्रकारे महत्वाचे रस्ते सुध्दा दुर्लक्षीत का राहतात असा प्रश्न नागरिकांना पडत आहे. ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, आमदार फंड, खासदार फंड अशा विविध माध्यमातून केंद्र आणि राज्य सरकारकडून निधी येत असतो त्यामुळे कोणत्याही माध्यमातून सदरील रस्ता करता येवू शकतो.
इच्छाशक्तीची आवश्यकता !
विकासकामांना केंद्र किंवा राज्य शासनाच्या माध्यमातून निधी येत असतो, अर्थातच कोणालाही खिशातून पैसे खर्च करण्याची आवश्यकता नसते, परंतू विकास कामे करतांना कोणता फंड सदरील कामासाठी वापरता येईल आणि त्यासाठी कोणते प्रयत्न आवश्यक आहे याचा विचार करून नियोजन केल्यास काहीच अवघड नाही, कारण मोठमोठे हायवे रस्ते होवू शकतात तर अशा प्रकारचे सामान्य रस्ते होण्यास काहीच अडचण नाही. अर्थातच इच्छाशक्ती असल्यास विकासकामे तातडीने मार्गी लागतात यात शंका नाही.