एल्गार न्यूज (परवेज पठाण) :-
गोरगरीब व सर्वसामान्य नागरिक आपल्या कष्टाचा पैसा खर्च करून लग्न कार्य व इतर कारणांसाठी सोने खरेदी करत असतो. मात्र या गोरगरीब व सर्वसामान्य जनतेने खरेदी केलेले सोने खरंच नियमान्वये आणि जेवढे भासवले जाते तेवढ्या कॅरेटचे असतात का ? असा प्रश्न उपस्थित होवू लागला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, कुंभार पिंपळगांव (ता.घनसावंगी, जि.जालना) येथे सोनेरी दुनियेत लाखो नव्हे तर कोट्यावधी रूपयांची उलाढाल होत आहे, जिकडे नजर फिरवली तिकडे सोने चांदीची दुकाने दिसून येत आहे. मात्र काही अपवाद सोडल्यास या दुकानांमध्ये खरेदी विक्री होणारे सोने हे शासनाच्या नियमान्वये खरेदी विक्री होत आहे का ? असा सवाल जनतेतून विचारला जात आहे.
काळा बाजार कसा ?
सोने विक्री करतांना GST असलेली बिले देणे आवश्यक असतांना कुंभार पिंपळगांव येथे अपवाद सोडल्यास GST ची बिले दिली जात नाही, अत्यंत साध्या पावत्यांवर लाखोंची किंबहुना कोट्यावधीची उलाढाल करण्यात येत आहे. सोने किती कॅरेटचे आहे याचाही उल्लेख सदरील साध्या पावतीवर नसतो, त्यामुळे आपण घेत असलेले सोने किती कॅरेटचे आहे हे गोरगरीब व सर्वसामान्य नागरिकांना कळत नाही. उदाहरणार्थ ग्राहकाला 24 किंवा 22 कॅरेट सांगून 18 कॅरेट सोने दिले जात नसेल हे कशावरून ? कारण पावतीवर तर उल्लेखच नाही.
GST बिले नाहीत !
शासनाच्या नियमान्वये सोने विक्री करतांना GST चे बील देणे आवश्यक असतांना तसे होत नाही, साध्या पावतीवर लिहून बिल दिले जात आहे, विशेष म्हणजे अपवाद सोडल्यास या साध्या पावतीवर GST क्रमांक सुध्दा नाही. याचाच अर्थ GST चे बील दिले जात नाही म्हटल्यावर अपवाद सोडल्यास शासनाकडे पूर्णपणे GST सुध्दा भरला जात नाही असेच म्हणावे लागेल.
हिशोब कोणाकडे ?
येथे सर्वसामान्य नागरिकांचे कोट्यावधी रूपयांचे सोने गहाण ठेवलेले असतात. सदरील दुकानदारांकडे किती किमतीचे सोने आहे ? तसेच सदरील गहाण ठेवलेल्या सोन्यावर किती टक्के व्याज घेतला जातो ? याचा हिशोब शासनाच्या एखाद्या यंत्रणेकडे आहे का ? कोट्यावधी रूपयांचे सोने खरेदी विक्री होत असतांना इनकम टॅक्स कडे टॅक्स भरला जातो का ? काहीजण टॅक्स भरत असतील परंतू जे दुकानदार साध्या पावत्यांवर सोने विक्री करत आहेत त्याचा हिशोब कसा लागणार ? GST नसलेल्या साध्या पावत्यांवर सोने विक्री होत असेल तर GST आणि इनकम टॅक्सचा हिशोब कसा लागणार ? असे अनेक प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहेत.
ग्राहकांची अडचण !
जर बहुतांश विक्री साध्या पावतीवर होत असेल तर ग्राहकाला भविष्यात तेच सोने इतर ठिकाणी विक्री करायचे असेल तर तो घेणारा दुकानदार GST ची पावती मागणार नाही का ? जर GST ची पावती नसेल तर त्या ग्राहकाने कमी किंमतीत सोने विक्री करावे का ? बँका अशा साध्या पावतीवरील सोने गहाण ठेवतील का ? असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे.
सावळा गोंधळ !
बहुतांश विक्री साध्या पावतीवर होत असेल तर GST चा प्रश्न येतोच कुठे ? काही दुकानदार GST भरत असल्याचे सांगितले जाते, मात्र जेवढ्या ग्राहकांना सोने / दागिने विक्री केले आहे तेवढ्या ग्राहकांचा GST भरला जातो का ? बोटावर मोजण्या इतक्या ग्राहकांचा जीएसटी भरला जात असेलही मात्र साध्या पावत्यांवर विक्री केलेल्या सोन्याचे काय ? असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे. शिवाय E-way बिलाबाबतही गोंधळ दिसून येत आहे.
हॉलमार्क कुठे आहे ?
केंद्र शासनाच्या भारतीय मानक ब्युरो अर्थात BIS (Bureau of Indian Standards) ने मागील काळात सोन्यावर हॉलमार्किंग करणे आवश्यक केले आहे, हॉलमार्किंग केलेल्या सोने अथवा दागिन्यावर BIS चिन्ह असतो, दुसरे संकेत म्हणजे शुद्धतेबद्दल असते म्हणजे किती कॅरेट सोने आहे ते कळते, तर तिसरे संकेत 6 अंकी HUID नंबर असतो. जेणेकरून भविष्यात सदरील सोने अथवा दागिन्याबद्दल माहिती घेता येते. त्यामुळे सोने किंवा सोन्याचे दागिने विकतांना विक्रेत्याने BIS मानकांची पूर्तता करणे आवश्यक आहे. मात्र अपवाद सोडल्यास येथे या नियमालाही बगल देण्यात येत असल्याचे सांगितले जात आहे.
सोनेरी दुनियेतूनही दुजोरा !
एल्गार न्यूजने स्वत: काही पावत्या पाहिल्यानंतर व माहिती घेतल्यानंतर सदरील प्रकार समोर आला. सोबतच नाव गोपनीय ठेवण्याच्या अटीवर स्थानिक सोनेरी दुनियेतीलच एका दुकानदाराने सुध्दा वरील प्रकाराला दुजोरा दिला आहे. त्यामुळे “दाल में कुछ नही बल्की बहोत कुछ काला है” असं म्हणायला हरकत नाही. अर्थातच अधिक तपास झाल्यास या सोनेरी दुनियेतील बरंच काही चित्र स्पष्ट होणार आहे यात शंका नाही.