एल्गार न्यूज (परवेज पठाण) :-
लोकप्रतिनिधींना आणि अधिकाऱ्यांना रहदारीचे रस्ते चिखलमय ठेवून नेमकं साध्य काय करायचं असतं हे समजण्या पलीकडे आहे. केंद्र आणि राज्य शासनाचा कोट्यावधी रूपयांचा निधी येवून सुध्दा लोकप्रतिनिधी मुलभूत समस्यांकडे दुर्लक्ष करत असतील तर हे गांवकऱ्यांचे दुर्दैवच म्हणावे लागेल.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, कुंभार पिंपळगांव (ता.घनसावंगी, जि.जालना) येथील जुन्या पोलीस चौकी समोरून (तत्कालीन डॉ.खान यांच्या दवाखान्या लगत) जाणाऱ्या गल्लीतील रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. या भागात मोठ्या प्रमाणावर लोक राहतात, रस्त्याच्या दोन्ही बाजुला असंख्य घरे आहेत, परंतू या भागातील नागरिकांना मुख्य रस्त्यावर येण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे.
शाळकरी मुलांना त्रास !
सध्या पावसाळा असल्यामुळे थोडा सुध्दा पाऊस पडला तरी सदरील रस्ता चिखलमय होवून जातो, या भागातून असंख्य लहान मुले शाळेला जातात, परंतू त्यांना रस्ता चिखलमय झाल्यावर कोठून जावे हा प्रश्न पडतो, अनेकदा शाळकरी मुले या रस्त्यावर घसरून पडतात किंवा रस्ता चिखलमय दिसल्यावर शाळेला जाण्यास टाळाटाळ करतात, कारण जेथे मोठ्या व्यक्तीला चालणे शक्य नाही तेथून चिमुकली मुले किंवा लहान मुले चालणार कशी ? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.
सर्वांनाच त्रास !
सदरील रस्त्यावरून वयस्कर व्यक्तींना जाणे येणे अवघड आहे, या भागातील नागरिकांना एखादी वस्तू खरेदी करायची असेल तर मुख्य रोडवर येणे आवश्यक आहे, मात्र रस्ता चिखलमय असल्याने महिलांसह नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे, याच रस्त्याने पुढे गेल्यावर अनेकांची शेती आहे, त्यामुळे महिलांसह अनेक शेतकऱ्यांना याच रस्त्याने चिखल तुडवत जावे लागते.
नेमकं साध्य काय करायचंय ?
लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांना असंख्य लोकांच्या रहदारीचा हा रस्ता अशा प्रकारे चिखलमय ठेवून नेमकं साध्य काय करायचं असतं ? खरंच एखाद्या चिखलमय स्पर्धेसाठी लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांनी हा रस्ता राखुन तर ठेवला नाही ना ? असा प्रश्न रस्त्याकडे पाहिल्यावर सहज पडतो.
नागरिकांचे दुर्दैव !
शासन मुलभूत प्रश्न सोडवण्यासाठी कोट्यावधी रूपये निधी देत असतांनाही सर्वसामान्य नागरिकांना स्वातंत्र्याच्या 76 वर्षानंतरही साधारण रस्ते सुध्दा मिळू नये हीच मोठी शोकांतिका म्हणावी लागेल. ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, आमदार फंड, खासदार फंड अशा अनेक माध्यमातून शासन निधी देत असतांनाही लोकप्रतिनिधी, अधिकारी दुर्लक्ष करत असतील तर हे नागरिकांचे मोठे दुर्दैवच म्हणावे लागेल.
आता तरी लक्ष देणार का ?
अर्थातच कोणा एकाला दोष देवून उपयोग नाही, कारण या परिस्थितीला यापूर्वीचे आणि आत्ताचे संबंधित सर्वच लोकप्रतिनिधी आणि अधिकारी जबाबदार आहेत असं म्हटल्यास चुकीचे ठरणार नाही. मात्र आता तरी एकमेकांकडे बोट न दाखवता कोणत्याही फंडच्या माध्यमातून हा रस्ता तात्काळ करण्याबाबत लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांनी पुढाकार घ्यावा एवढीच माफक अपेक्षा परिसरातील नागरिक करत आहेत.
इतर बातम्या खाली पहा…
व्हाट्सअॅप ग्रुप जॉईन करा.
नि:पक्ष, निर्भीड व रोखठोक बातम्या नियमित आपल्या मोबाईलवर प्राप्त करण्यासाठी वर किंवा खाली दिसत असलेल्या “जॉईन करा” या चिन्हाला क्लिक करून आमच्या व्हाट्सअॅप ग्रुपला जॉईन व्हा.