एल्गार न्यूज (परवेज पठाण) :-
जालना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी व उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांनी एका प्रकरणात तातडीने खुलासा सादर करण्याचे आदेश देवूनही आदेशाला केराची टोपली दाखवण्यात आल्याने आता थेट जालना जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या समोर घनसावंगी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी, विस्तार अधिकारी व ग्रामसेवक यांना हजर राहून सुनावणीला सामोरे जावे लागणार आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, पारडगांव – आंतरवाला बु. ग्रुप ग्रामपंचायतच्या सदस्य सौ.प्रतिभा विष्णू माकोडे व इतर सदस्यांनी ग्रामसेवक गावात येत नसल्याबाबत, अर्थात वारंवार गैरहजर राहत असल्याबाबत, नागरिकांना मुलभूत सुविधा उपलब्ध होत नसल्याबाबत तसेच भ्रष्टाचार झाल्याबाबत अनेक तक्रारी केल्या होत्या, परंतू त्या तक्रारीची दखल पंचायत समितीकडून घेण्यात न आल्याने सदस्य सौ.प्रतिभा विष्णू माकोडे यांनी जालना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा मिना यांच्याकडे तक्रार दिली होती.
सदरील तक्रारीवरून जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सखोल चौकशी करून अहवाल सादर करणे बाबत घनसावंगी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अमित कदम यांना आदेशित केले होते, मात्र गटविकास अधिकारी यांनी कोणताही अहवाल जि.प.मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना सादर केला नाही. त्यानंतर तक्रारदारांनी पुन्हा काही दिवसांनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांना कारवाई करण्याबाबत तक्रार केली होती.
तक्रारदार यांच्याकडून दुसऱ्यांदा तक्रार आल्यानंतर CEO यांनी दि.10/06/2024 रोजी त्यांच्या दालनात सुनावणी आयोजित केली होती, सदर सुनावणीसाठी ग्रामसेवक हजर होते, मात्र विस्तार अधिकारी पी.पी.खिल्लारे गैरहजर होते, त्यानंतर CEO यांनी विस्तार अधिकाऱ्यांच्या लेखी खुलाशासह गटविकास अधिकाऱ्यांना अहवाल सादर करण्यास सांगितले होते, मात्र तरीही गटविकास अधिकाऱ्यांकडून अहवाल सादर झाला नाही.
तक्रारदारांनी कारवाई होत नसल्याबाबत थेट विभागीय आयुक्तांकडे तक्रार दाखल केल्यानंतर व उपायुक्तांनी कानपिचक्या दिल्यानंतर उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पं) अंकुश चव्हाण यांनी CEO यांच्या आदेशानुसार गटविकास अधिकारी यांना चौकशी अहवालासह दि.15/07/2024 रोजी CEO यांच्या दालनात सुनावणीस हजर राहण्याचे आदेश काढले आहेत. सोबतच या सुनावणीस विस्तार अधिकारी (पं) पी.पी.खिल्लारे, ग्रामविकास अधिकारी एन.डी.बरीदे, ग्रामसेवक व्ही.एस.गोरे, ग्रामसेवक सचिन नारनवरे आणि पंचायत समिती मधील पंचायत 2 (तक्रार शाखा) सांभाळणारे कनिष्ट सहाय्यक यांना देखील सुनावणीसाठी उपस्थित राहण्योच आदेश काढले आहेत.
कोणी कोणाला पाठीशी घातलं ?
सदरील प्रकरणात आतापर्यंत पंचायत समिती अधिकाऱ्यांनी वरिष्ठांच्या आदेशाला केराची टोपली दाखवल्याचे दिसून येत आहे, कारवाई करण्याकडे दुर्लक्ष केल्याने थोडक्यात आटोपून जाणारे प्रकरण आता लांबल्याचे दिसत आहे. म्हणजे सदरील प्रकरणात कोणी कोणाला पाठीशी घातलं हे आता दि.15 रोजी CEO यांच्या समोर होणाऱ्या सुनावणी दरम्यान स्पष्ट होणार आहे. या प्रकरणात आता कोणावर कारवाई होते हेच पाहणे महत्वाचे ठरणार असून या प्रकरणात अनेकांचे इंडिकेटर लागल्याचे दिसून येत आहे.