एल्गार न्यूज (परवेज पठाण) :-
जेव्हा सर्वसामान्य जनता ओरडून ओरडून सांगत असतांनाही यंत्रणा जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असेल, जेव्हा जनतेचे हाल होत असतांनाही यंत्रणा बघ्याची भुमिका घेत असेल, जेव्हा यंत्रणेपुढे सर्वसामान्य जनता हतबल होतांना दिसत असेल तेव्हा समजावं की यंत्रणा गेंड्याच्या कातडीप्रमाणे झाली आहे आणि त्या यंत्रणेला कोणाचीही भिती राहीलेली नाही.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, घनसावंगी तालुक्यातील कुंभार पिंपळगांव येथील कचऱ्याचा प्रश्न अत्यंत गंभीर होत चालला असून गेल्या 3 महिन्यापेक्षा जास्त कालावधीपासून घंटागाडी बंद असून नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे. 20 ते 25 हजार लोकसंख्या असलेल्या कुंभार पिंपळगांव शहराला एकमेव असलेली घंटागाडी जाणीवपूर्वक बंद ठेवण्यात आल्यामुळे गावात घराघरात आणि जागोजागी कचरा साचला असून अनेक ठिकाणी घाण व दुर्गंधीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
घंटागाडी बंद का ?
ग्रामपंचायतकडून मागील 3 ते 4 महिन्यांपासून एकच गोष्ट सांगण्यात येत आहे की, पाणी टंचाई दूर करण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या टँकरवर पाणी वाटप करण्यासाठी माणूस भेटत नसल्यामुळे घंटागाडीच्या ड्रायव्हरला पाण्याच्या टँकरवर पाठवण्यात येत आहे. मात्र खरंच गावात पाणी वाटप करण्यासाठी माणूस मिळत नसेल का ? टँकरवर तर ड्रायव्हर प्रशासनाकडून आधीच देण्यात आलेले आहेत, फक्त पाणी वाटपासाठी मागील 4 महिन्यात ग्रामपंचायतला एकही माणूस भेटला नाही का ? कचरा जाणीवपूर्वक न उचलून ग्रामपंचायत समस्त नागरिकांवर काही राग व्यक्त करत आहे का ? असे अनेक प्रश्न नागरिक विचारत आहेत.
ग्रामसेवकांची गैरहजेरी !
मागील 8 ते 10 दिवसांपासून ग्रामसेवक गावात फिरकलेच नाहीत असे नागरिक सांगत आहेत, आज दि.04 रोजी ग्रामपंचायतला ग्रामसेवकांनी दर्शन दिल्याचे सांगण्यात येत आहे. परंतू कायमच ग्रामसेवक ग्रामपंचायतला गैरहजर असतात त्याचे काय ? मनमर्जीप्रमाणे 8 – 10 दिवसाला ग्रामसेवक येत असतील तर नागरिकांच्या समस्या सोडवायच्या कोणी ? ग्रामसेवक मर्जीतल्या लोकांची कामे गावाबाहेर हॉटेल मध्ये, धाब्यावर, कुठेतरी लांब झाडाखाली किंवा घनसावंगी-अंबडला बोलावून करत असतील तर ग्रामपंचायतचा कारभार चालवायचा कोणी ? असाही प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत.
भुताला दंडवत !
खरं काय माहित नाही, पण कुंभार पिंपळगांवच्या ग्रामसेवकांना मागील काळात ग्रामपंचायत मध्ये भूत असल्याचा भास होत होता असं ऐकायला मिळालं होतं. ग्रामसेवकांना भूत असल्याचा भास होण्यासह ग्रामपंचायत मध्ये गेले की, त्यांना घाम फुटतो, मळमळ होते, जणू ग्रामपंचायतच्या आतील जागा ग्रामसेवकाला उचलून बाहेर फेकल्यासारखं करते असंही ऐकायला मिळालं होतं. कदाचित त्यामुळेच ग्रामसेवक ग्रामपंचायतला येत नसावेत, कदाचित ग्रामपंचायतला 8 – 10 दिवसात एखादी चक्कर मारून भुताला साष्टांग दंडवत घालून पुन्हा लवकर येणार नाही असं सांगून परत जात असावेत अशीही उपरोधक चर्चा ऐकायला मिळत आहे.
विकास खुंटला !
जर इतर गोष्टींमध्ये तथ्य नसेल तर ग्रामसेवकांना कुंभार पिंपळगांव ग्रामपंचायतला आठवड्यातून 5 दिवस येण्यात काय अडचण आहे. 5 दिवस शक्य नसेल तर आठवड्यातून किमान 3 दिवस येणे शक्य नाही का ? असाही प्रश्न उपस्थित होत आहे. मनमर्जीप्रमाणे ग्रामसेवक वारंवार गैरहजर राहत असल्यामुळे गावाचा विकास खुंटला आहे. गावात शासनाच्या योजना व विकास कामे करण्यात ठप्प आहेत. स्थानिक काही लोकांचा आशिर्वाद घेवून ग्रामसेवकांना असा गैरसमज झाला आहे की आपलं कोणीच काही वाकडं करू शकत नाही. कदाचित नियम कायद्याचा त्यांना विसर पडला असावा त्यामुळे ते असं करत असावेत.
महिला मोर्चा काढणार ?
ग्रामपंचायत कडून मागील 3 महिन्यांपासून कचराच उललला जात नाही, घंटागाडी सुस्थितीत असतांनाही त्यास जाणीवपूर्वक बंद ठेवण्यात आले आहे. आमच्या घरात मोठ्या प्रमाणावर कचरा साचत आहे, रस्त्यावर कचरा टाकावा तर भांडणे होत आहेत, घरात कचरा साचवावा तर दुर्गंधी पसरत आहे, त्यामुळे आम्ही हतबल झालो असून तात्काळ कचरा उचलण्याची सोय करण्यात आली नाही तर नाईलाजाने आम्ही महिला मोठ्या संख्येने कचरा घेवून ग्रामपंचायतला धडकणार असल्याची प्रतिक्रिया गावातील माता भगीनींनी दिली आहे.
कारवाई होणार ?
याबाबत जालना जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रा.पं.) अंकुश चव्हाण व घनसावंगीचे गटविकास अधिकारी अमित कदम या दोन्ही मान्यवर अधिकाऱ्यांनी याप्रकरणाची चौकशी करून योग्य ती कारवाई करण्यात येईल असे एल्गार न्यूजला सांगितले.