एल्गार न्यूज (परवेज पठाण) :-
शासनाने राज्यातील महिलांसाठी महत्वपूर्ण अशी माझी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. या योजनेच्या माध्यमातून महिलांना महिन्याला 1500 रूपये दिले जाणार आहे. शासनाने सदरील निर्णय मागील आठवड्यात घेतला व जीआरही काढला आणि 1 तारखेपासून नोंदणी सुरू होईल म्हणून सांगितले परंतू नोंदणीसाठी आवश्यक असलेले अॅप किंवा वेबसाईटच अजून सुरू नाही मग नोंदणी करायची कशी ? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, महाराष्ट्र शासनाने महिला व मुलींना स्वावलंबी व आत्मनिर्भर बनवणे तसेच पुरेशा सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने एक महत्वाचे असे पाऊल उचलत “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” योजना सुरू केली आहे. अर्थातच ही योजना महिला व मुलींसाठी नक्कीच चांगली असून स्वागतार्ह आहे. परंतू दि.1 पासून या योजने अंतर्गत नोंदणी सुरू करण्याची घोषणाच नव्हे तर जीआर सुध्दा काढण्यात आला परंतू नोंदणीसाठी आवश्यक असलेले मोबाईल अॅप किंवा वेबसाईटच अजून सुरू नाही. त्यातच धावपळ करतांना एका महिला भगीनीने प्रतिक्रिया दिली की, 1500 येतील तेव्हा येतील पण 4 दिवसांपासून नवरा बेजार, तेवढी तर मजुरी गेली, खर्चही झाला, कोणी सांगता का नोंदणी केव्हा होणार ?
दिलासा देण्याचा प्रयत्न !
शासनाने निर्णय घेवून तसा जीआर सुध्दा काढला मात्र त्यामध्ये अत्यंत किचकट आणि वेळखाऊ अटी होत्या, विशेष म्हणजे तहसीलचे उत्पन्नाचे प्रमाणपत्र आणि तहसीलचेच डोमीसाईल (रहीवाशी) प्रमाणपत्र आवश्यक होते. तहसील कार्यालयात होणारी गर्दी आणि महिलांसह नागरिकांची होणारी धावपळ पाहता शासनाने सदरील प्रमाणपत्रांऐवजी इतर प्रमाणपत्रांचे किंवा कागदपत्रांचे पर्याय दिले आहेत, म्हणजेच काही अंशी का असेना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे.
गोंधळ आणि धावपळ !
शासनाने निर्णय घेतल्यानंतर वेळ कमी असल्यामुळे तहसील कार्यालय आणि सीएससी केंद्रावर प्रचंड प्रमाणात गोंधळ आणि धावपळ सुरू झाली होती, अनेकांनी तर सांगितलं की, 1500 येतील तेव्हा येतील त्याआधीच 1500 खिशातून खर्च व्हायची वेळ आली आहे. मात्र आता शासनाने अर्ज करण्याची तारीख वाढवली असून कागदपत्रांमध्येही पर्याय दिले आहेत, त्यामुळे आता महिलांना यामुळे किती दिलासा मिळतो हे येत्या काळात कळेलच.
पूर्वतयारी का नाही ?
शासनाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने अंतर्गत नोंदणीची प्रक्रिया कशी पार पाडली जाणार ? नोंदणीसाठी कोणती वेबसाईट असणार ? कोणते मोबाईल अॅप असणार ? जर वेबसाईटची किंवा अॅपची निर्मिती झाली आहे तर त्याची योग्य ती चाचणी घेण्यात आली होती का ? योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी प्रशासन तयार होते का ? कागदपत्र देण्यासाठी प्रशासनाने तयारी केली होती का ? ज्यांच्या माध्यमातून नोंदणी होणार आहे त्यांना प्रशिक्षण देण्यात आले का ? असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
निर्णय चांगलाच पण…!
शासनाने महिलांसाठी घेतलेला निर्णय नक्कीच चांगला आणि स्वागतार्ह आहेच परंतू नोंदणीच्या दृष्टीने आणि कागदपत्रांच्या दृष्टीने आवश्यक असलेली पूर्वतयारी करण्याकडे दुर्लक्ष करण्यात आले का ? असाही प्रश्न उपस्थित होत आहे. शासनाने 1 तारखेपासून नोंदणीला सुरूवात होईल असे सांगितले होते, परंतू आजच्या (दि.3) तारखेपर्यंत नोंदणीला सुरूवात झालेली नाही. अर्थातच त्यासाठी आवश्यक असलेली वेबसाईट किंवा मोबाईल अॅप अद्याप नोंदणीसाठी Live झालेले नाही.
तांत्रिक अडचणीची शक्यता !
एकाचवेळी महाराष्ट्रातील लाखो महिलांची नोंदणी केली जाणार असल्यामुळे संबंधित वेबसाईट किंवा मोबाईल अॅप मध्ये तांत्रिक अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे. यापूर्वीचा अनुभव पाहता शासकीय वेबसाईटचे सर्वर हे सुमार दर्जाचे पहायला मिळाले आहेत, म्हणजेच थोडासा लोड वाढला तरी या वेबसाईट बंद पडतात असा अनुभव आहे, त्यामुळे यावेळी शासनाने काय नियोजन केले आहे हे येत्या काही दिवसात कळणारच आहे. तुर्तास तरी शासनाने लाखो महिलांची नोंदणी करण्यासाठी योग्य ते नियोजन केले असेल अशी अपेक्षा करायला हरकत नाही.
उद्या पासून अॅप Live ?
वेबसाईट किंवा अॅप कधी सुरू होणार याबाबत जिल्हा परिषद प्रशासनाकडून माहिती घेतली असता, उद्या दि.4 पासून “नारी शक्ती दूत” अॅप सुरू किंवा Live करण्याचा प्रयत्न असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे खरंच दि.4 पासून नोंदणी सुरू होते की इतर काही तांत्रिक अडचणी निर्माण होतात हेच पाहणे महत्वाचे ठरणार आहे.